वाळू तस्करांचा गोंगाट थांबला, महसूलने खोदले नदीपात्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2017 12:28 PM2017-10-29T12:28:05+5:302017-10-29T12:28:23+5:30
अंगावर टॅक्टर घालने जिव्हारी लागल्याने तलाठी व मंडळ अधिकारी यांनी गोदापात्रात जाणा-या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे खोदले आहेत.
शहागड (जि.जालना) : अंगावर टॅक्टर घालने जिव्हारी लागल्याने तलाठी व मंडळ अधिकारी यांनी गोदापात्रात जाणा-या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे खोदले आहेत. त्यामुळे सध्यातरी अवैध वाळू तस्करांचा गोंगाट थांबला आहे.
ऑक्टोबर महिन्यात पहिल्या-दुसर्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे व तसेच जायकवाडीतून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीपात्र भरून वाहत होते. तर पाण्यात पाणीदार वाळू वाहून आली होती. त्यामुळे अवैध वाळू तस्कर पाणी ओसरण्याची वाट पाहत होते.
गोदापात्रातील पाणी ओसरताच परिसरातील अवैध वाळू तस्करांनी आपला मोर्चा गोदावरी नदीपात्रातील पाणीदार वाळू चोरण्याकडे वळवला होता. तर पाच-पंचवीस टॅक्टर दिवस मावळे पासून दिवस उजाडेपर्यंत गोदावरीत हैदोस घालत होते. तर मध्यरात्रीनंतर च्या या गोंगाटामुळे शहागड-वाळकेश्वर वासिय त्रस्त झाले होते.
दोन दिवसांपूर्वी तलाठी अभिजित देशमुख यांनी अवैध वाळू तस्करांविरुद्ध दंड थोपटून शुक्रवारी सकाळी अवैध वाळूचे टॅक्टर अडवत असताना अवैध वाळू भरलेला टॅक्टर चालकाने तलाठी अभिजित देशमुख यांच्या अंगावर घालत पळवुन नेला. यावेळी प्रसंगावधान राहिल्याने तलाठी अभिजित देशमुख बालंबाल बचावले.
दरम्यान तर वाळू तस्करांच्या गोंगाटाचा त्रास शहागड-वाळकेश्वर वासियांना असहाय होत असल्याने ग्रामस्थांच्या तक्रारी वाढल्या होत्या. शनिवारी सायंकाळी मंडळाधिकारी कृष्णा एडके, व तलाठी अभिजित देशमुख यांनी गोदापात्रातून अवैध वाळू तस्करीसाठी वाहतूक करण्यात येणारे रस्त्यावर जेसीबी यंत्रांद्वारे पाच ठिकाणी दहा दहा फुटीर खड्डे केले आहेत. त्यामुळे शहागड-वाळकेश्वर ची अवैध वाळूतस्करीला लगाम बसला असून अवैध वाळू वाहतूक पुर्णत बंद झाली असल्याने वाळू तस्करांचा गोंगाट कमी झाला असल्याने परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.