कर्जच न घेतलेल्यांनीही भरले माफीसाठी अर्ज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 11:33 PM2018-02-08T23:33:44+5:302018-02-08T23:33:49+5:30
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी अनेकांनी पीककर्ज घेतलेले नसतानाही आॅनलाईन अर्ज भरल्याचे समोर येत आहे. त्यामुळे बँकांसह अंमलबजावणी यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे
जालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी अनेकांनी पीककर्ज घेतलेले नसतानाही आॅनलाईन अर्ज भरल्याचे समोर येत आहे. त्यामुळे बँकांसह अंमलबजावणी यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. शिवाय संगणक प्रणालीशी माहितीची जुळवाजुळव होत नसलेल्या खात्यांची (अनमॅच्ड डेटा) संख्याही वाढली आहे.
कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तीन लाख ९७ हजार शेतक-यांनी आॅनलाईन अर्ज भरले होते. तर बँकांनी कर्जदार असलेल्या तीन लाख बारा हजार शेतक-यांनी माहिती आपले सरकार पोर्टलवर अद्ययावत केली होती. कुटुंबनिहाय विचार करता कर्जमाफीसाठी अडीच लाखांवर कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले होते. आॅनलाईन अर्ज केलेल्या शेतक-यांपैकी आतापर्यंत एक लाख ५१ हजार २०६ शेतकºयांसाठी ९५९ कोटी १३ लाख रुपये बँकांना प्राप्त झाले आहेत. पैकी एक लाख ११ हजार ३४ शेतक-यांच्या कर्जखात्यात ५९७ कोटी, तीन लाख, ६९ हजार रुपये जमा झाले आहेत. दरम्यान, मागील आठवड्यात जिल्ह्यातील ५४ हजार ५९९ शेतक-यांची माहिती बँकेने आॅनलाईन पोर्टलवर भरलेल्या माहितीशी जुळत शासनाने या शेतक-यांच्या याद्या बँकांमध्ये प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पैकी सुमारे २५ हजारांवर शेतक-यांनी कर्जमाफीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे बँकांना उपलब्ध करून दिली. त्यामुळे माहिती जुळत नसलेल्या शेतक-यांचा आकडा कमी होणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता हा आकडा आता ६२ हजार ९०० वर गेला आहे. अनेक शेतक-यांनी कुठल्याही बँकेचे कर्ज घेतलेले नसताना केवळ कर्जमाफीचा काही लाभ मिळेल का, म्हणून अर्ज केलेले आहेत. त्यामुळे कर्जमाफीची अंमलबजावणी करणारी यंत्रणा व बँकांचे काम वाढले आहे. शेतक-यांनी आपली माहिती तातडीने बँकेस उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे व जिल्हा उपनिबंधक एन. व्ही.आघाव यांनी केले आहे.
----------
एकापेक्षा अधिक बँकांकडून कर्ज
काही शेतक-यांनी दोन ते तीन बँकांकडून पीकक र्ज घेतले आहे. परंतु कर्जमाफी योजनेनुसार कोणत्याही एकाच कर्जखात्यास दीड लाखापर्यंतची माफी मिळणार आहे. माफीसाठी दोन ते तीन बँकांचे अर्ज भरलेल्या शेतकºयांमुळे माहिती जुळत नसलेल्या शेतक-यांची संख्या वाढली आहे.
-----------
व्याज आकारणी परत मिळणार का ?
कर्जखात्यावर व्याज न आकारण्याचे आदेश गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याचा फायदा अनेक शेतक-यांना होणार आहे. मात्र, ज्या शेतक-यांनी व्याजाची रक्कम भरून कर्जखाते बेबाकी करून घेतले त्यांना बँका व्याजारी रक्कम परत देणार का हा प्रश्न शेतक-यांमधून उपस्थित केला जात आहे.