लाच घेणारा नव्हे... देणारा अभियंता अडकला एसीबीच्या सापळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 01:34 PM2021-07-31T13:34:07+5:302021-07-31T13:35:46+5:30
जालना तालुक्यातील काकडा येथे खासदार निधीतून स्मशानभूमी आणि रस्ता मजबुतीकरणाचे दहा लाख रुपयांचे काम पूर्ण झाले होते.
जालना : नेहमी लाच घेणारा व्यक्तीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकतो. परंतु शुक्रवारी जालना शहरात याच्या नेमके उलटे घडले. लाच देणारा पंचायत समितीतील अभियंता आणि त्याच्या साथीदारास सरपंचाला लाच देताना अटक केल्याने मोठी खळबळ उडाली.
जालना तालुक्यातील काकडा येथे खासदार निधीतून स्मशानभूमी आणि रस्ता मजबुतीकरणाचे दहा लाख रुपयांचे काम पूर्ण झाले होते. या कामाचे चार लाख ७३ हजार रुपयांचा धनादेश हा ग्रामपंचायतच्या खात्यात जमा झाला होता. हा धनादेश संबंधित कंत्राटदारास द्यावा म्हणून जालना पंचायत समितीत कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंता देविदास भिकाजी पाटील आणि त्यांचा मित्र काशीनाथ सखाराम चव्हाण (दोघे रा. शिवनगर) यांनी काकडा येथील सरपंचांना लाच म्हणून १५ हजार रुपये आणि ऑडिटसाठीचे चार हजार रुपये असे एकूण १९ हजार रुपये देऊ केले होते. मात्र, सरपंचांची लाच घेण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या संदर्भात पाटील यांची तक्रार जालन्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार एसीबीने सापळा लावून जालन्यातील मंठा मार्गावरील एका मॉलच्या पार्किंगमध्ये कनिष्ठ अभियंता पाटील आणि त्यांचा मित्र चव्हाण यांना सरपंचास १९ हजार रुपये देताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक ब्रह्मदेव गावडे तसेच जालन्याचे पोलीस उपाधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक संग्राम ताटे, जमादार शिवाजी जमधडे, गजानन धायवट, कृष्णा देठे, जावेद शेख, गजानन कांबळे, गणेश बुजाडे, चालक प्रवीण खंदारे यांनी यशस्वी केली.