जुळ्या भावांमुळे निवडणूक आयोग बुचकळ्यात;मतदान यादीतील सारख्याच फोटोंमुळे दिली नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 05:31 PM2022-03-24T17:31:08+5:302022-03-24T17:34:58+5:30
सारखीच दिसत असल्याने जुळ्यांची पंचाईत; मतदानाच्या सर्वोच्च अधिकारापासून राहू शकतात वंचित
- फकीर देशमुख
भोकरदन ( जालना ) : जुळे असल्याने नैसर्गिकरीत्या एक सारखे दिसत असल्याने दोन जुळ्या भावांना मतदानाच्या सर्वोच्च अधिकारापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मतदान यादीत सारखेच फोटो असल्याने निवडणूक विभागाने एकाचे नाव कमी करण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे.
सध्या निवडणूक विभागाच्यावतीने मतदान याद्या अद्यावत करणे सुरु आहे. यात एकापेक्षा जास्त वेळा नाव, नावातील दुरुस्ती अशी कामे सुरु आहेत. एका पेक्षा जास्त ठिकाणच्या यादीत नाव असल्यास एकाच ठिकाणी नाव ठेवून बाकीच्या ठिकाणची नावे कमी करण्यात येत आहे. यासाठी मतदारास आधी नोटीस देण्यात येते. अशीच नोटीस भोकरदन शहरातील रोकडा हनुमान मंदिर परिसरातील दोन भावांना आली आहे. येथील भाग क्रमांक 186 च्या मतदार यादीत अनुक्रमांक 186 वर उत्तम कोंडीबा सपकाळ यांचे नाव व फोटो आहे तर अनुक्रमांक 987 वर दत्तू कोंडीबा सपकाळ यांचा नाव व फोटो आहे. हे दोघे जुळे असल्याने चेहऱ्यात साम्य आहे. दत्तू सपकाळ व उत्तम सपकाळ हे दोन्ही मतदार वेगवेगळे आहेत. परंतु त्यांना केवळ चेहरा साधर्म्य असल्याने नाव कमी करण्याची नोटीस आली आहे.
आणखी एक प्रकरण
त्याचप्रमाणे भाग क्रमांक 186 मध्ये गजानन कोंडीबा सपकाळ यांचे 984 क्रमांकावर नाव व फोटो आहे, मात्र त्यांच्या फोटो सारखाच एक फोटो सलीम नूर सय्यद रा धावडा यांचा आहे. त्यामुळे त्यांना सुध्दा एक नाव कमी करण्याची नोटीस देण्यात आली आहे. वास्तविक एक मतदार हा धावडा येथील तर दुसरा मतदार हा भोकरदन शहरातील आहे.
बीएलओ कडून शोध
निवडणूक विभागाने या भागासाठी नेमणूक केलेले बीएलओ शेख लालू सर यांनी सांगितले की, या दोघांची भेट घेऊन नोटीस दिली आहे. हे दोघे संख्ये जुळे भाऊ आहेत. मी त्यांची भेट घेतली. मात्र, मला ही कोणता दत्तू व कोणता उत्तान हे ओळखता आले नाही. त्यांनी आमचे दोघांचे ही नावे मतदार यादीत असावीत अशी मागणी केली. त्यांची फोटो तहसील कार्यालयात जमा करणार आहे.