दहा हजार नागरिकांना पालिकेच्या मालमत्ताकरासाठी नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 06:46 PM2020-11-12T18:46:35+5:302020-11-12T18:51:38+5:30

चालू वर्षाची थकबाकी ही जवळपास २९ कोटी ३२ लाख रूपये आहे.

Notice to ten thousand citizens for municipal property tax | दहा हजार नागरिकांना पालिकेच्या मालमत्ताकरासाठी नोटिसा

दहा हजार नागरिकांना पालिकेच्या मालमत्ताकरासाठी नोटिसा

Next
ठळक मुद्देशहरात जवळपास ६२ हजार मालमत्ता आहेत.

जालना : पालिकेचा मुख्य आर्थिक स्त्रोत म्हणजेच मालमत्ताकर होय. कोरोनामुळे मालमत्ताकराची वसुली ठप्प झाली होती. ही वसुली करण्यासाठी पालिकेने आता कंबर कसली आहे. जवळपास सर्व व्यवहार पूर्ववत झाल्याने नागरिकांनी आता त्यांच्याकडील थकबाकी भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी शहरातील दहा हजार नागरिकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

शहरात जवळपास ६२ हजार मालमत्ता आहेत. त्यांच्याकडे चालू वर्षाची थकबाकी ही जवळपास २९ कोटी ३२ लाख रूपये आहे. तर एकूण थकबाकी ही ६५ कोटी ४० लाख एवढी आहे. हा करवसुलीचा डोंगर कमी करण्यासाठी पालिकेने सहा पथकांची स्थापना केली आहे. त्यातच ज्यांच्याकडे २५ हजार रूपयांपेक्षा अधिकचा कर थकला आहे, अशांनी तो येत्या पंधरा दिवसांत भरावा, यासाठीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटिसा नागरिकांना मिळाल्यानंतर खळबळ उडाली आहे. ऐन दिवाळी सणामध्ये पालिकेने एक प्रकारचा वसुलीचा धमाका सुरू केला आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये पालिकेची केवळ ७९ लाख रुपये एवढीच कर वसुली झाली. यामुळे पालिकेच्या विकासकामांसह प्रशासकीय यंत्रणेवर आर्थिक ताण आला आहे. अनेकांची देणी थकली असून, यामुळे कंत्राटदार आणि अन्य बिल थकलेल्या कंत्राटदारांकडून सततचा पाठपुरावा केला जात आहे. परंतु, पालिकेच्या तिजोरीत पैसाच नसल्याने दिलेेले धनादेशही न वटविण्याच्या सूचना संबंधितांना लेखा विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

उद्योजकांकडून वसुलीची आशा
जालना नगरपालिकेच्या हद्दीत दोन औद्योगिक वसाहती आहेत. त्यात जवळपास ४०० पेक्षा अधिक लहान- मोठे उद्योग सुरू आहेत. कोरोनानंतर हे उद्योगचक्र वेगाने फिरत आहे. याचा परिणाम पालिकेच्या मालमत्ताकर वसुलीसाठी सकारात्मक होईल, अशी आशा पालिकेकडून व्यक्त केली जात आहे.

नवीन कर आकारणीनुसार नोटीस
दहा वर्षांनंतर नगरपालिकेने गतवर्षी मालमत्ता करांचे सर्वेक्षण करून नवीन कर आकारला आहे. या नवीन कर आकारणीनुसार या मालमत्ता वसुलीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. नवीन कर आकारणी करताना अनेकांवर तो चुकीचा लादला गेल्याचा आरोप होता. त्यासाठी तीन हजार जणांनी आक्षेप नोंदविले होते.  त्यावर सुनावणी घेऊन निकाली काढण्यात आले.
- नितीन नार्वेकर, मुख्याधिकारी, जालना

Web Title: Notice to ten thousand citizens for municipal property tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.