आता एक तर माझी अंत्ययात्रा निघेल, नाहीतर मराठ्यांच्या आरक्षणाची यात्रा निघेल- मनोज जरांगे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 08:03 AM2023-09-06T08:03:39+5:302023-09-06T08:03:52+5:30
शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यात झालेला संवाद...
-विजय मुंडे
अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची मनधरणी करण्यासाठी राज्य शासनाचे शिष्टमंडळ मंगळवारी दुपारनंतर उपोषणस्थळी दाखल झाले. यावेळी शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यात झालेला हा संवाद...
गिरीश महाजन : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्वांशी बोलणं झाले आहे. मार्ग काढायचा आहे. सर्वजण पॉझिटिव्ह आहेत. कायदेशीर बाबी सोडविण्यासाठी एक महिन्यांचा वेळ हवा.
मनोज जरांगे : तुम्हाला एक महिन्यांचा अवधी कशाला पाहिजे. यादीत ८३ क्रमांकावर मराठा आहे. मग त्याला अहवाल कशाला पाहिजे.
गिरीश महाजन : समिती हैदराबादला गेली. आम्ही सगळे रेकॉर्ड आणतोय. तुम्ही सोबत चला आपण बसू चर्चा करू. आता उपोषण संपवा.
मनोज जरांगे : आम्ही उपोषण नाही थांबविणार. आम्ही तुम्हाला यादी दिली. तुम्ही समजून घ्या. तुम्ही खूप मोठे निर्णय घेतले आहेत. सगळं काही होतं.
अर्जुन खोतकर : तुमच्या प्रयत्नाने सर्वजण पॉझिटिव्ह आहेत. तुम्ही समाजाला वेळ द्यावा.
मनोज जरांगे : वेळ कशाला, जर ८३ क्रमांकावर मराठा आहे. द्यायला सरकारला प्रॉब्लेम नाही. त्याला चॅलेंज होऊ शकत नाही.
अतुल सावे : त्याला सिस्टीममध्ये आणून करावे लागेल ना
मनोज जरांगे : अहो, सिस्टिममध्येच आणलेली आहे ना यादी. बाकी गेले कसे सगळे मग बिगर सिस्टिमचे. दादा तुमच्याकडे ओबीसीची यादी आहे. समितीला तिथेच बस म्हणा. काही गरज नाही त्यांना फिरवायची. विदर्भातील सर्व मराठा ओबीसीत आहे. खानदेशचा पूर्ण गेला. आम्ही काय केलं मग. तुम्ही अध्यादेश काढा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल.
अर्जुन खोतकर : पाटील वेळ मिळेल का
मनोज जरांगे : दिला ना वेळ. मामा, आपण बसलो त्यावेळी सीएम साहेबांनी एक महिना मागितला. मी तुम्हाला तीन महिने दिले. तुम्ही परत का वेळ मागता. आम्ही १९९० पासून विनाकारण बाहेर आहोत.
संदीपान भुमरे : नाही मिळालं तर आम्ही जबाबदार राहू.
मनोज जरांगे : नाही मिळालं तर, झालं ना समाजाचं वाटोळं. त्यापेक्षा मी असेच मेलेलो बरे. आता मी शेवटचे लढतोय. आता एक तर माझी अंत्ययात्रा निघेल नाही तर मराठ्यांच्या आरक्षणाची यात्रा निघेल. बाळांनो जगलो तर तुमचा. मेलो तर समाजाचा.
गिरीश महाजन : एवढी टोकाची भूमिका आंदोलनात घेऊन जमत नाही
मनोज जरांगे : याला टोक नाही म्हणत साहेब, ४ फेब्रुवारीपासून लढतोय.
संदीपान भुमरे : मरायची भाषा नाही करायची, लढायचं
मनोज जरांगे : नाही लढतोयच. फक्त कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून ही लढाई करतोय आम्ही. शांततेची. तरी यात आमचे डोके फोडलेत तुम्ही. ह्यो काय डोकं फुटलेला तुमच्या पुढे आहे.
गिरीश महाजन : आम्ही अहवाल मागतोय.
मनोज जरांगे : अहो, अहवाल आलाय ना... नका अंत पाहू. मी तुम्हाला आणखी चार दिवस देतो. नका ताणू साहेब, भरती आलीय जवळ.
गिरीश महाजन : चला मुंबईला या. चर्चा करा.
मनोज जरांगे : नाही उद्याचाला मी शिष्टमंडळ पाठवितो.
संदीपान भुमरे : पाटील तुम्ही चला
मनोज जरांगे : अहो मी उपोषणकर्ता आहे मी कसा येणार. तुम्ही सगळे करून घ्या.
गिरीश महाजन : थोड्या अडचणी आहेत. कायदेशीर बाबी आहेत.
मनोज जरांगे : अन् मला काय कळतं कायद्यातलं.
गिरीश महाजन : आता तुम्ही लोकांना बोला, टोकाची भूमिका घेऊ नका
मनोज जरांगे : नाही नाही. (उपस्थितांना उद्देशून) आता सरकारशी आपली चर्चा झाली. महाराष्ट्रातील समाजाच्या वतीने आपण सर्वजण चार दिवसांचा वेळ दिलाय. चार दिवसांत ते आरक्षणाचा जीआर घेऊन येतील. शांततेत आंदोलन करू. आपल्याला हे आरक्षण कायमस्वरूपी टिकवायचे आहे. त्यामुळे आणखी चार दिवसांचा वेळ देऊ. स्पष्ट सांगतो. चार दिवसानंतर अन्नपाणी सगळे बंद.