आता महिन्यातून चार वेळा पाणी सोडण्याचे पालिकेचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:51 AM2019-04-29T00:51:54+5:302019-04-29T00:52:13+5:30
पंधरा दिवसानंतर एकदा सुटणारे पाणी आता आठ दिवसांवर आणण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने तयारी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहराला पंधरा दिवसानंतर एकदा सुटणारे पाणी आता आठ दिवसांवर आणण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने तयारी केली आहे. चंदनझिरा, ४८८ विश्रामगृह, आणि कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात बांधण्यात आलेल्या तीन टाक्यांमध्ये पाणी जायकवाडीतून आलेले पाणी साठविण्यात येणार आहे. यामुळे पाण्याची नासाडी कमी होऊन नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळणार आहे.
सध्या ९० किमी.वरुन पैठण येथील जायकवाडी धरणातून शहरासाठी २० एमएलडी पाणी उचलले जाते. यातील ५ एलएमडी पाणी अंबड शहराला वितरित केले जाते. ३ एमएलडी पाणी गळती होते. यामुळे शहराला फक्त १२ एमएलडी पाणी मिळत आहे. आलेले १२ एमएलडी पाणी साठविण्याची क्षमता नगरपालिकाकडे नसल्याने आलेले पाणी जसेच्या तसे शहरात सोडल्याशिवाय पालिका प्रशासना कडे सध्या पर्याय नाही. यामुळे दोन दोन तास पाणी शहरात सोडण्यात येत आहे. यामुळे हजारो लिटर पिण्यायोग्य पाणी नाल्यामध्ये वाहून जात आहे. उन्हाची वाढती तीव्रता बघता नगरपालिका प्रशासनाने चंदनझिरा येथे १० लाख लिटर, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात १० लाख लिटर तसेच शासकीय विश्रामगृह ४८८ येथे १० लाख लिटर अशा ३० लाख लिटर पाणी साठवेल या क्षमतेच्या टाक्या बांधल्या आहेत. येत्या आठ दिवसांत या तिन्ही टाक्यांमध्ये जायकवाडीतून आलेले पाणी साठविण्यात येणार आहे. यामुळे योग्य नियोजन करुन शहराला पाणी पुरवठा होणार आहे याचा नियोजन पालिका प्रशासनाने केले असून आता महिन्यातून किमान चार वेळा पाणी पुरवठा करण्यावर आमचा भर असणार आहे.
व्हॉल्व्हची गळती थांबविली
जायकवाडीतून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला अंबड तालुक्यातील चिंचखेड येथे गळती लागली होती. यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली होती. यामुळे शहरात दोन दिवसांपासून निर्जळी होती.
यामुळे पाण्याअभावी नागरिकांची गैरसोय झाली होती. नगरपालिका प्रशासनाने युध्दपातळीवर काम करून चिंचखेड, शेवगा पाटी, आणि पाचोड परिसरातील चार ठिकाणची लागलेली गळती थांबविली.