आता वीकेंड घरातच; हॉटेलिंग राहणार बंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:20 AM2021-06-27T04:20:18+5:302021-06-27T04:20:18+5:30
जालना : १ जूनला शिथिल करण्यात आलेले निर्बंध कसेबसे २५ दिवस सुरू राहिले. आता तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाल्याने ...
जालना : १ जूनला शिथिल करण्यात आलेले निर्बंध कसेबसे २५ दिवस सुरू राहिले. आता तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाल्याने बाजारपेठेतील गर्दी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने रविवारपासून सायंकाळी ४ वाजेनंतर जवळपास सर्वच व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यात आज घडीला कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. असे असतानाही बाजारपेठेतील गर्दी लक्षात घेता कोरोनाची तिसरी लाट केव्हाही येऊ शकते. यामुळे आतापासूनच निर्बंध कडक करण्यात आले आहेत.
हॉटेल व्यवसायाची घरघर कायम
गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या साथीमुळे हॉटेल व्यवसाय कोलमडला आहे. मध्यंतरी सुरू झालेला व्यवसाय तिसऱ्या लाटेमुळे पुन्हा बंद होणार आहे. यामुळे मोठे नुकसान हाेत असल्याचे दिसून येते.
- विनीत सहानी
हॉटेलप्रमाणेच ढाबेदेखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा मोठा फटका महामार्गावरून वाहतूक करणाऱ्यांना होणार आहे. त्यामुळे रात्री ढाबे सुरू ठेवावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
- मोहन इंगळे
हॉटेल कर्मचाऱ्यांचे तर आणखी हाल
गेल्या दीड वर्षापासून हॉटेल व्यवसाय डबघाईला आला आहे. त्यामुळे अन्यत्र काम मिळनेही अवघड झाले आहे. येथे दररोज पगार मिळत हाेता. तो आता बंद झाला आहे.
- गणेश दहातोंडे
कुठलाही आजार आणि घटना घडली की सर्वप्रथम बाजारपेठ बंद होते. या बाजारपेठेत सर्वात जास्त नुकसान हे हॉटेलचालकांचे होते. यामुळे आमच्या राेजगारावर गदा आली आहे.
-महिपत सुरासे
हॉटेल व्यवसाय हा अत्यंत महत्त्वाचा आणि दररोज गोरगरिबांच्या गरजेचा म्हणून ओळखला जातो. येथे अनेकांना रोजगार उपलब्ध होतो;
परंतु असे असतानाच दीड वर्षापासून कोरोनाने कहर केला आहे. यामुळे हॉटेल व्यवसायावर आर्थिक संक्रांत आली आहे.
सरकारने किमान घरपोच सेवा सुरू ठेवल्याने थोडी मदत होईल. ती तरी कायम ठेवावी.