जालना जिल्ह्यात कोरोना संशयितांची संख्या ४५ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 11:57 PM2020-03-23T23:57:28+5:302020-03-23T23:57:46+5:30
रविवारी जनता कर्फ्यूमध्ये सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मात्र, सोमवारची सकाळ सुरू झाली ती नेहमीच्या वर्दळीने! ना कोरोनाची भीती ना कलम १४४ चे गांभीर्य!
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : रविवारी जनता कर्फ्यूमध्ये सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मात्र, सोमवारची सकाळ सुरू झाली ती नेहमीच्या वर्दळीने! ना कोरोनाची भीती ना कलम १४४ चे गांभीर्य! दुकानांना टाळे असले तरी मुख्य रस्त्यावरील वाहने आणि एकत्रित येऊन गप्पा रंगविणारे लोक, असे चित्र सोमवारी सायंकाळपर्यंत दिसून आले. जिल्ह्यात संशयितांची संख्या ४५ वर गेली असून, जिल्ह्यात केवळ केवळ २५ व्हेंटिलेटर आहेत. दरम्यान, सूचनांचे पालन होत नसल्याने शासनाने सोमवारी सायंंकाळी संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांनी या कालावधीत तरी घरात बसणे अपेक्षित आहे.
कोरोना विषाणूचा फैलाव वाढत असून, देशातील, महाराष्ट्रातील रूग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. जालना जिल्ह्यात पुणे, मुंबईच नव्हे तर विदेशातूनही शेकडो नागरिक शहरी, ग्रामीण भागात आले आहेत. पैकी अनेकांची आरोग्य तपासणी झालेली नाही. चक्क पोलीस आणि आरोग्य यंत्रणेला असे लोक शोधून काढण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करावे लागत आहेत. जालना येथील जिल्हा रूग्णालयात सुरू असलेल्या विलगीकरण कक्षात सोमवारी दुपारपर्यंत ४५ संशयितांना दाखल करण्यात आले आहे. पैकी १० जणांच्या स्वॅबचे अहवाल सुदैवाने निगेटिव्ह आले आहेत. ३४ नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. एकूण ११८ विदेशी प्रवाशांचे विलगीकरण केले आहे. जिल्ह्यात १४२१ सर्दी, ताप असलेल्या रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले आहेत. गत काही दिवसांपासून जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्यासह सर्वच प्रशासकीय यंत्रणा कोरोनाबाबत जागृती करीत आहे. गरज असेल तरच बाहेर पडावे, असे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर १४ मार्च रोजी जिल्ह्यात बंद ठेवण्यात आला होता. या बंदच्या काळात दुकाने बंद आणि नागरिक रस्त्यावर अशी स्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी जनता कर्फ्यू जाहीर केला होता. या कर्फ्यूमध्ये दिवसभर सहभागी होणाऱ्या अनेकांनी दरात येऊन टाळ्या वाजवित स्वागत केले. मात्र, काही महाभागांनी चक्क रस्त्यावर एकत्रित येऊन फटाके फोडून जल्लोष केला. हे युध्द डोळ्यांना न दिसणा-या कोरोना विषाणूशी आहे, याचे भान काहींना राहिलेले नाही. दुस-या दिवशी सोमवारी कलम १४४ लागू, लॉक डाऊन असल्याने महत्त्वाच्या आस्थापना वगळता इतर दुकाने बंद होते. तरीही रस्त्यावर नागरिक दिसत होते. ठिकठिकाणी गर्दी आणि रंगलेल्या चर्चा..!, हे चित्र होते.
आदेशाचे उल्लंघन : पोलिसांकडून गुन्हे दाखल
रविवारी जनता कर्फ्यू होता. मात्र, या कालावधीत दुकाने सुरू ठेवणा-या सहा जणांविरूध्द भोकरदन, जाफराबाद, जालना, सेवली, आष्टी ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर अवैध दारूविक्री करणाºया कारवाई करून ८०७० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भोकरदन तालुक्यात नाही व्हेंटिलेटरची सोय
४भोकरदन शहरातील शासकीय रूग्णालयासह तालुक्यातील एकाही खाजगी रूग्णालयात व्हेंटिलेटरची सोय नाही. अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोना विषाणूबाबत अधिक सतर्कता बाळगावी. शिवाय तालुक्यात अत्यावश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे.