फुकट्या प्रवाशांची संख्या दीडपट वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:26 AM2018-11-18T00:26:27+5:302018-11-18T00:26:39+5:30
विकास व्होरकटे। लोकमत न्यूज नेटवर्क जालना : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जालना जिल्ह्यातील बसेसमध्ये दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशांच्या संख्येत ...
विकास व्होरकटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जालना जिल्ह्यातील बसेसमध्ये दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. मागील वर्षी सात महिन्यांच्या कालावधीत ९० फुकटे प्रवासी आढळून आले होते, तर यंदा एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत यात तब्बल दीडपट वाढ झाली असून, यावर्षी १९० प्रवाशी फुकट प्रवास करतांना आढळले.
बसमध्ये फुकट प्रवाशांनी प्रवास करू नये, त्यांच्यावर वचक असावा, यासाठी एसटी महामंडळातर्फे जालना जिल्ह्यात ३ पथके मार्ग तपासणीसाठी २४ तास कार्यरत आहेत. हे पथके बाहेरील जिल्ह्यातून जालना जिल्ह्यात येणाऱ्या बसेस व जिल्ह्यातील सर्व बसमधील वाहक व प्रवाशांची तपासणी करतात. यात फुकट प्रवास करणाºया प्रवाशांवर व पैसे घेवूनही प्रवाशांना तिकीट न देणाºया वाहकांवर कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करतात.
यंदा एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यात पथकाने १३ हजार ५०० बसची तपासणी करण्यात आली. यात २ हजार ४६८ वाहकांची तपासणी केली. यावेळी १८ वाहकांनी पैसे घेवूनही प्रवाशांना टिकिट न दिल्याचे आढळून आले. तर तपासणी केलेल्या १३ हजार ५०० बसमध्ये १९० प्रवाशी विना तिकीट प्रवास करित असल्याचे तपासाणीत उघड झाले आहे. यांच्याकडून पथकाने २१ हजार ५४८ रू. दंड व बुडविलेले भाडे ९ हजार ७५० रू. असे एकूण ३१ हजार २९८ रूपये वसूल करण्यात आले असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले.