जमीन संपादनाच्या तक्रारींची व्याप्ती वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:33 AM2019-03-10T00:33:18+5:302019-03-10T00:34:06+5:30
मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गाची जमीन संपादन करताना अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कागदपत्रांची पूर्तता करून मावेजा लाटण्याचे प्रकार करण्याचे प्रयत्न झाले. परंतु, तक्रारदारांनी वेळीच पोलिसांमध्ये धाव घेतल्याने महसूल प्रशासनाचे धाबे दणाणले आहे
संजय देशमुख।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गाची जमीन संपादन करताना अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कागदपत्रांची पूर्तता करून मावेजा लाटण्याचे प्रकार करण्याचे प्रयत्न झाले. परंतु, तक्रारदारांनी वेळीच पोलिसांमध्ये धाव घेतल्याने महसूल प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. या सर्व गंभीर प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी केल्यास यातून मोठे गौडबंगाल उघडकीस येऊ शकते.
मुंबई-नागपूर असा समृद्धी महामार्ग जालना जिल्ह्यातील २५ गावातून जात आहे. त्यात विशेष करून पाणशेंद्रा येथील जमिनी संपादित करून त्याचा मावेजा देताना काही प्रमाणात निकष डावलण्यात आल्याच्या तक्रारी यापूर्वीच जालना येथील उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांच्यासह कदीम जालना पोलीस ठाण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने शरीफा बेगम यांच्या नावाने बनावट महिला उभी करून एका संशयित आरोपीने बॉण्डवर अदलाबदल पत्र तयार करून जमीनीचा मावेजा लाटल्या प्रकरणी यापूर्वीच कदीम जालना ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गट क्र. ४१ मध्ये एक हेक्टर ६५ आर एवढी जमीन संपादित करण्यात आली आहे. या संपादित जमिनीचा मावेजा ६३ लाख रूपये होतो. १९ डिसेंबर २०१६ रोजी हा मावेजा मंजूर झाला आहे.
मावेजा लाटण्यासाठी अंबड येथे शरीफा बेगमच्या नावाने अदलाबदल पत्र तयार केले. हा सर्व प्रकार २०१७ मध्ये अंबड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात घडला असून, हेच बनावट अदलाबदल प्रमाणपत्र भोकरदन येथील उपविभागीय कार्यालयातही सादर करण्यात आले. पूर्व नियोजित कट करून हे कुभांड रचले गेल्याचा संशय आहे. तसेच देवमूर्ती येथील भास्कर भाऊराव गरबडे, सुधाकर भाऊराव गरबडे आणि मुक्ता गरबडे यांनी देखील गट क्र. १४० मधील जमिनी संदर्भात तक्रार दाखल केली आहे. या जमिनीचा मावेजा हा दोन ते अडीच कोटीच्या घरात जातो. येथील चार एकर जमीन समृद्धी महामार्गासाठी अधिग्रहित केली आहे. यासह गट क्र. ४१ मध्ये रूख्मिणीबाई नागोजी खरटमल, लक्ष्मीबाई शांतीलाल कावळे यांची दोन हेक्टर जमीन समृद्धीत गेली आहे. याचा मावेजा ९० लाख ८७ हजार रूपये मंजूर झाला आहे. परंतु, याही प्रकरणात तक्रार दाखल झाल्याने याचे गांभीर्य वाढली आहे. मौजे बोरगाव (ता. जालना) येथील गट क्र. ३२४ मधील दोन हेक्टर जमीन रूख्मिणीबाई नागोजी खरटमल यांच्या नावे आपसात अदलाबदल करून घेण्यासाठी ३ मार्च २०१७ रोजी सामान्य प्रशासन विभाग जालन्याकडे अर्ज सादर केला होता. हा अर्ज फेटाळल्यानंतरही गट क्र. ४१ मधील जमिनीचा मावेजा चुकीच्या पद्धतीने लाटण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार कदीम जालना पोलिसांत दाखल झाली आहे. या तक्रारीची चौकशी सुरू असून, यात अद्याप कोणावरही ठपका ठेवण्यात आलेला नाही, अर्ज आल्याने उच्च पातळीवर चौकशी करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
नोंदणी संदर्भात तक्रारी
समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादन करताना अनेक शेतामध्ये फळबागा नसताना त्या जमिनी बागायती दाखविण्यात आल्या आहेत. तर काही जमिनीमध्ये विहिरी अथवा ठिबक सिंचन नसतानाही ते दाखवून अधिकचा मावेजा संबंधित सर्वेक्षण करणाऱ्या एजन्सीने नोंद केल्याने अधिकचा द्यावा लागला. तर काही जमिनीचे संपादन करताना देखील चुकीच्या नोंद करून जास्तीची जमीन दाखविण्यात येऊन कोट्यवधी रूपयांचा मावेजा वाटप करण्यात आला आहे.
कदीम जालना पोलीस ठाण्याकडे हे अर्ज प्राप्त झाल्याने समृद्धी महामार्गातही कोट्यवधी रूपयांचा मावेजा लाटण्यासाठी त्यावर नगर ठेवून काही भूखंड माफियांनी निकष डावलून तो लाटण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व प्रकरणामध्ये महसूल विभागातील काही महत्त्वाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हे सर्व सुरू असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. कदीम जालना पोलीस ठाण्याकडे आलेल्या सर्व तक्रारींची शहानिशा करून त्याची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीमध्ये दोषी आढळल्यास संबंधितांविरूद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. याची कुणकुण लागताच संशयित आरोपींनी लगेचच न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. परंतु, त्यात त्यांना कितपत यश येते, हे पाहणे लक्षणीय ठरणार आहे. तपास पोलीस निरीक्षक लोहकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक के. एच. निमरोट हे करीत आहेत.