टँकर्सची संख्या ४५ वर..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 12:58 AM2018-04-12T00:58:06+5:302018-04-12T00:58:06+5:30
दोन आठवड्यांपूर्वी ३९ असलेली टँकरची संख्या आत्ता ४५ वर गेली आहे. जालना, भोकरदन, जाफराबाद आणि परतूर तालुक्यातील टंचाई तीव्र झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात दिवसेदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. यामुळे ग्रामीण भागातील जलसाठ्यांत घट झाल्याने पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरूवात झाली आहे. दोन आठवड्यांपूर्वी ३९ असलेली टँकरची संख्या आत्ता ४५ वर गेली आहे. जालना, भोकरदन, जाफराबाद आणि परतूर तालुक्यातील टंचाई तीव्र झाली आहे.
यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. जाफराबाद, भोकरदन या तालुक्यांतही बऱ्यापैकी पाऊस झाला. मात्र, या दोन्ही तालुक्यांत कडक खडक असल्याने कितीही पाऊस पडला तरी पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. परिणामी लघु मध्यम प्रकल्प, बोअरवेल, विहिरी आदींना पाणीच राहत नाही. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाते. जलसाठा वाढत नसल्याने या तालुक्यांत टँकरची संख्या दरवर्षी वाढत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे जाफराबाद तालुक्यात १६ टँकर, भोकरदन तालुक्यात २७ टँकवरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच जालना आणि परतूर तालुक्यात सुध्दा काही भाग खडकाळ असल्याने अल्प प्रमाणात टँकरची मागणी आहे.
वाढते सिंचन आणि जायकवाडी धरणाचा परिसर असल्याने अंबड, घनसावंगी, मंठा आणि बदनापूर या तालुक्यांत वाढलेल्या सिंचनामुळे अद्याप टँकरची मागणी आलेली नाही. मात्र, आगामी काळात मागणी होण्याची शक्यता अधिका-यांनी व्यक्त केली आहे. टंचाईकृती आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे. उपाययोजना आखण्यात आलेली आहे. मागणीनुसार टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे अभियंत्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील जलसाठे कमी होत असल्याने टंचाईच्या झळा तीव्र होण्याची चिन्हे आहेत. जलयुक्तच्या कामांमुळे तात्पुरत्या स्वरुपात साठा वाढला. पण तोही आटल्याने येत्या काळात टंचाई भीषण होण्याची शक्तय गृहित धरुन प्रशासनाने उपाययोजना आखली आहे. टॅकर्सची संख्या शतक गाठण्याची शक्यता आहे.