उन्हाळ्याच्या सुटीत शाळेत तयार केली रोपवाटिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:38 AM2019-05-19T00:38:29+5:302019-05-19T00:39:13+5:30
घाणखेडा येथील जिल्हा परिषद शाळेचे कीर्तनकार शिक्षक ज्ञानेश्वर झगरे यांनी आपल्या १० वर्षाच्या सेवाकालात या शाळेचे रूपडे बदलून टाकले आहे. स्वत: मुख्यालयी राहून हा धडपड्या शिक्षक शाळा, विद्यार्थी व गावच्या विकासासाठी सारखा झटत असतो.
नसीम शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी : गावचा विकास हा त्या गावातील शाळेत घडणाऱ्या कोवळ्या पिढीच्या प्रगतीवर अवलंबून असतो. आजही शाळेच्या विकासाचा ध्यास घेऊन रात्रंदिवस झटणारे अनेक शिक्षक साने गुरूजींचा वसा पुढे चालवित आहेत. जाफराबाद तालुक्यातील घाणखेडा येथील जिल्हा परिषद शाळेचे कीर्तनकार शिक्षक ज्ञानेश्वर झगरे यांनी आपल्या १० वर्षाच्या सेवाकालात या शाळेचे रूपडे बदलून टाकले आहे. स्वत: मुख्यालयी राहून हा धडपड्या शिक्षक शाळा, विद्यार्थी व गावच्या विकासासाठी सारखा झटत असतो.
एकीकडे अन्य शिक्षक सध्या उन्हाळी सुटीचा आनंद घेत असताना या अवलिया शिक्षकाने सुटीतील खिचडीच्या निमित्ताने शाळेच्या परिसरातील चिमुकल्यांचा गोंगाट कायम ठेवला आहे. इतकेच नाही तर खिचडीसोबत विद्यार्थ्यांना सुटीचा काहीतरी उपक्रम मिळावा म्हणून शाळेत रोपवाटिका तयार केली आहे.
या रोपवाटिकेत चिंच, सीताफळ, रामफळ, गुलमोहर, कडूलिंब, हदगा इ. बिया विद्यार्थ्यांकडून गोळा करून जवळपास १५० पिशव्या मातीने भरल्या आहेत. या पिशव्यात बी पेरून त्यांना पाणी दिले जात आहे. तयार झालेल्या रोपांचे पावसाळ्यात शाळा व गाव परिसरात वृक्षारोपण केले जाणार आहे. यामुळे ऐन सुटीत मोबाईल, टीव्हीत रमणारे विद्यार्थी थेट शाळेत श्रमदान करून पर्यावरणास मोठा हातभार लावत आहेत.
सर्वांच्या सहकार्याने रोपवाटिका
या रोपवाटिकेसाठी झगरे गुरूजी यांना शालेय विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समितीसह शाळेचे स्वयंपाकी जगन खिरडकर, गावातील विकास ढाले, रवींद्र मोरे, घाणखेडा येथील कृषी सहायक नीलेश घेवंदे, केंद्रप्रमुख सलीम पठाण, मुख्याध्यापक संतोष खरे, शिक्षक चंद्रकांत तोंडे आदींचे भरीव सहकार्य लाभले आहे.