ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 07:57 AM2024-06-21T07:57:34+5:302024-06-21T07:58:38+5:30

उपोषणाचा आठवा दिवस : वडेट्टीवार यांचा मुख्यमंत्र्यांशी फोनवर संवाद.

OBC reservation will not be affected says Chief Minister eknath shinde | ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही : मुख्यमंत्री

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही : मुख्यमंत्री

लोकमत न्यूज नेटवर्क, वडीगोद्री (जि. जालना) : मागील आठ दिवसांपासून वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचावसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे उपोषण सुरू आहे. या उपोषणकर्त्यांची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर संवाद साधला. ओबीसी आरक्षणाला कसलाही धक्का लागणार नाही, हे यापूर्वीच सांगितले आहे. उद्याच (शुक्रवारी) शासकीय शिष्टमंडळ वडीगोद्री येथे पाठवितो, असे मुख्यमंत्र्यांनी वडेट्टीवार यांना फोनवरून सांगितले.  

वडेट्टीवार  म्हणाले, काल आणि आजही मुख्यमंत्र्यांशी आपण बोललो आहोत. ओबीसी समाजात जन्मलेली व्यक्ती म्हणून ओबीसी समाजाच्या पाठीमागे उभा राहणे माझे कर्तव्य आहे.  मतांसाठी समाजाला भडकविण्यात आल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. उद्या शिष्टमंडळ येणार आहे. लागले तर मीपण येतो. उद्या आंदोलन समाप्त करू या, असेही ते म्हणाले.  

आरक्षणाचे ताट वेगवेगळे असावे : आंबेडकर  
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही गुरुवारी उपोषणकर्ते हाके, वाघमारे यांची भेट घेऊन चर्चा केली. ओबीसी आणि मराठ्यांच्या आरक्षणाचे ताट वेगवेगळे असले पाहिजे. परंतु, दोघांना एकमेकांसमोर विधानसभेपर्यंत हे भिडवत राहतील, अशी माझी धारणा असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर टीका केली. 

उपचार घेण्यास उपोषणकर्त्यांचा नकार 
हाके आणि वाघमारे यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असून, डॉक्टरांनी दोन्ही उपोषणकर्त्यांना उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उपचार घेणार नसल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.

लातुरात ओबीसींचे साखळी उपोषण
लातूर : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लातूर येथील गांधी चौकात साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. हरिभाऊ गायकवाड यांच्यासह ओबीसी तसेच व्हीजेएनटी प्रवर्गातील कार्यकर्ते उपोषणात सहभागी झाले आहेत.

नांदेडमध्ये रास्ता रोको 
ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये या मागणीसाठी ओबीसी समाज बांधवांनी गुरुवारी लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे नांदेड-लातूर महामार्गावर रास्ता रोको केला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

...अन्यथा ओबीसी पेटून उठेल : अशोक जीवतोडे
चंद्रपूर : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू नये याची काळजी  सरकारने घ्यावी, अन्यथा ओबीसी पेटून उठेल, असा इशारा भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. अशोक जीवताेडे यांनी दिला आहे. 

Web Title: OBC reservation will not be affected says Chief Minister eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.