महापुरुषांच्या पुतळ्याखाली बसून अर्वाच भाषेत ओबीसी कधीही बोलत नाही; हाकेंची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 04:18 PM2024-07-22T16:18:43+5:302024-07-22T16:19:19+5:30
मंडलस्तंभाला अभिवादन करून ओबीसी बचाव जनआक्रोश यात्रेला सुरूवात.
वडीगोद्री ( जालना) : काही नेत्यांच्या आदेशावरून काम करत असलेल्या मनोज जरांगे यांनी समाजात फूट पाडण्याचा उद्योग बंद करावा, अशी टीका ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी आज केली. तसेच महापुरुषांच्या पुतळ्याखाली बसून अर्वाच भाषेत कधीही ओबीसी बोलत नाही. जरांगे कोणाच्या सांगण्यावरून आंदोलन करत आहेत, असा सवालही हाके यांनी जरांगे यांना ओबीसी बचाव जनआक्रोश यात्रेच्या सुरुवात प्रसंगी केला.
अंबड तालुक्यातील दोदडगाव येथील मंडलस्तंभाला अभिवादन करून ओबीसी बचाव जनआक्रोश यात्रेला आज दुपारी सुरूवात करण्यात आली. या दरम्यान डोणगाव, टाका रामगव्हाण, वडीगोद्री, गहीनीनाथनगर या ठिकाणी फटाक्याची आतषबाजी करत हाके आणि वाघमारे यांचे औक्षण करण्यात आले. जरांगे पुढे म्हणाले, राज्यात कुणबीच्या लाखों बोगस नोंदी झाल्या आहेत. एका व्यक्तीला एकच आरक्षण घेता येते, पण महाराष्ट्रात एक व्यक्ती तीन तीन आरक्षणाचा लाभ कसा घेऊ शकते, असा सवाल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला.
एकाच जातीला हजारो कोटी
ओबीसींचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी जनआक्रोश यात्रा सूरू केली. सरकार एका जातीसाठी साडेचार हजार कोटी व्याज भरत आहे, तुमच्या घरातून पैसे आणले का? तुम्हाला कोणी अधिकार दिला एवढे पैसे एका जातीला देण्याचा असा सवाल, हाके यांनी सरकारला केला. शासनकर्ती जमात मागास कशी असू शकते, मराठा समाज जर मागास असेल तर पुढारलेला समाज कोणता? हे या मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं, असेही हाके म्हणाले.
सर्व राजकारण्यांनी बोलावे
आम्ही ओबीसींचा आवाज बनण्याचा प्रयत्न करतोय. धनगर ओबीसी आरक्षणाच्या बाहेर आहे हे सांगितलं जातंय, फोडा आणि झोडा ही त्यांची नीती आहे. ओबीसीने कधीही कायदा हातात घेतला नाही. ओबीसींच्या आरक्षणावर शरद पवार मौन बाळगून आहेत. सर्व राजकारण्यांनी पुढे येऊन बोलल पाहिजे, असे आवाहन हाके यांनी केले.
जरांगे राज्य सरकारचे लाडके, नवनाथ वाघमारे यांची टीका
जरांगे यांनी आंदोलन केल्यापासून जातीय सलोखा बिघडला आहे. राज्य सरकार तर जरांगेचे लाड करत आहे. जरांगे पाटील यांनी राजकारणात आलं पाहिजे. त्यानंतर त्यांना कोणाला पाडायचं त्यांना पाडून दाखवलंच पाहिजे असे आव्हान वाघमारे यांनी केले.