जालन्यात आज ओबीसींची आरक्षण बचाव एल्गार सभा; सत्ताधारी-विरोधक एकाच मंचावर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 08:43 AM2023-11-17T08:43:42+5:302023-11-17T08:54:43+5:30

जालन्यात आज ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा होणार आहे.

OBC's reservation defense Elgar Sabha in Jalna today | जालन्यात आज ओबीसींची आरक्षण बचाव एल्गार सभा; सत्ताधारी-विरोधक एकाच मंचावर

जालन्यात आज ओबीसींची आरक्षण बचाव एल्गार सभा; सत्ताधारी-विरोधक एकाच मंचावर

जालना : गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. ज्या जालना जिह्यातून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. त्याच जालन्यात आज ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा होणार आहे. जालन्यातील अंबडमध्ये ओबीसींच्या हक्कासाठी ही सभा घेण्यात येणार आहे. या सभेला राज्यातील विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत.

मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, माजी मंत्री पंकजा मुंडे, रासपचे महादेव जानकर, शब्बीर अन्सारी, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह प्रमुख ओबीसी नेत्यांची या सभेस प्रमुख उपस्थिती राहणार असून, सभेच्या निमित्ताने राज्यातील ओबीसी आपली एकजूट दाखवणार आहे. तसेच,नेतेमंडळींच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या सभेसाठी लाखोंच्या संख्येने ओबीसी समाज बांधव येणार असल्याने ठिकठिकाणी पाणी, अल्पोपहाराची सोय करण्यात आली आहे. शिवाय वाहनांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

एकीकडे मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभे राहिलं आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. अशातच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आज सकल ओबीसी समाजाच्या वतीने आरक्षण बचाव एल्गार सभा होत आहे.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त
या सभेदरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी १२०० पोलिस कर्मचारी, अधिकारी, २०० अधिकारी, कर्मचारी इतर जिल्ह्यातील राहणार आहेत. एसआरपीएफच्या तीन कंपन्या, रॅपिड अॅक्शन फोर्सची एक कंपनी, क्चिक अॅक्शन टीम, ९ स्ट्रायकिंग फोर्स बंदोबस्ताचे काम पाहणार आहे.

३० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे
अंबड शहरातील सभास्थळ, विविध मार्गावर जवळपास ३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेयांद्वारे या भागातील हलचालींवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र टीमही कार्यरत राहणार आहे.

आचारसंहितेचे पालन करावे
अंबड येथील सभेच्या पार्श्वभूमीवर पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. कोणी व्हॉटस्अॅपवर भडकावू संदेश पाठवित असतील तर अशा पोस्ट अॅडमिनने डिलिट कराव्यात किंवा संबंधितांची माहिती पोलिसांना द्यावी, अशी सूचना ग्रुप अॅडमिनला दिली आहे. सभास्थळी येणाऱ्यांनीही आचारसंहितेचे पालन करावे. - शैलेश बलकवडे, पोलिस अधीक्षक, जालना
 

Web Title: OBC's reservation defense Elgar Sabha in Jalna today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.