जालन्यात दहावीचा पेपर व्हायरल प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 04:43 PM2019-03-04T16:43:52+5:302019-03-04T16:44:27+5:30
१ मार्च रोजी दहावीचा मराठी विषयाचा पेपर व्हायरल झाला होता
मंठा (जालना ) : दहाविच्या मराठी विषयाची प्रश्नपत्रिका व्हायरल केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर मंठा येथील पोलीस ठाण्यात सोमवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे येथील संत तुकडोजी महाराज ज्ञानदीप विद्यालयात १ मार्च रोजी दहावीचा मराठी विषयाचा पेपर होता. पेपर सुरू असतानाच अज्ञात व्यक्तीने प्रश्नप्रत्रिका व्हॉट्सअॅपवर व्हायरल केली होती. या प्रकरणी सोमवारी गटशिक्षणाधिकारी माणिक राठोड यांच्या फिर्यादिवरून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्वप्रथम प्रश्नपत्रिका कोणी व्हायरल केली. याचा तपास पोलीस करित आहेत. तसेच ज्या- ज्या व्यक्तींनी ही प्रश्नपत्रिका व्हायरल केली आहे. त्यांचाही शोध पोलीस घेत आहेत. यामुळे यात अनेक जण अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे सदरील परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक, विद्यार्थी यांच्यामध्ये खळबळ उडाली आहे.
जालना जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी यांना वरिष्ठांकडून आलेल्या आदेशानुसार त्यांनी येथील गट शिक्षण अधिकारी एम. डी. राठोड यांना फिर्याद देऊन पेपर व्हायरल करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सदरील फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गट्टूवार करित आहेत.