जिल्हा बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 01:02 AM2020-01-15T01:02:40+5:302020-01-15T01:03:08+5:30
बनावट स्वाक्षरी करून बँक ग्राहकाच्या खात्यावरील पैसे उचलून फसवणूक केल्याप्रकरणी जालना जिल्हा सहकारी बँकेच्या सेवली येथील तत्कालीन शाखा व्यवस्थापकासह दोघाविरूध्द मंगळवारी सेवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : बनावट स्वाक्षरी करून बँक ग्राहकाच्या खात्यावरील पैसे उचलून फसवणूक केल्याप्रकरणी जालना जिल्हा सहकारी बँकेच्या सेवली येथील तत्कालीन शाखा व्यवस्थापकासह दोघाविरूध्द मंगळवारी सेवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २६ एप्रिल २०१६ रोजी घडली होती.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जालना तालुक्यातील सेवली येथील मिलिंद वसंतराव देशमुख यांचे जालना जिल्हा बँकेच्या सेवली शाखेत खाते आहे. देशमुख यांनी त्यांच्या खात्यात काही रक्कम ठेवली होती. खात्यावरील दहा हजार रूपये रक्कम २६ एप्रिल २०१६ रोजी रक्कम लंपास झाल्याचे लक्षात आले. ही रक्कम नितीन वसंतराव देशमुख व तत्कालीन शाखा व्यवस्थापकाने संगनमत करून बनावट स्वाक्षरी करून काढल्याची तक्रार मिलिंद देशमुख यांनी सेवली पोलीस ठाण्यात दिली आहे. तसेच पैसे परत मागितल्यानंतर जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी मिलिंद देशमुख यांच्या तक्रारीवरून नितीन वसंतराव देशमुख व तत्कालीन बँक शाखा व्यवस्थापकाविरूध्द सेवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विलास मोरे हे करीत आहेत.