जिल्हाधिकाऱ्यांकडून कार्यालयाची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 01:17 AM2019-07-25T01:17:14+5:302019-07-25T01:17:27+5:30
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांना अचानक भेट दिल्याने खळबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांना अचानक भेट दिल्याने खळबळ उडाली. यावेळी पुरवठा, गौण खनिजसह अन्य विभागांना भेटी दिल्या असता, अनेक फाईली अस्ताव्यस्त पसरलेल्या आढळून आल्या. तसेच अनेक कर्मचारी हे कार्यालयीन वेळेत गायब असल्याचे दिसून आले. अशांना नोटीस देऊन त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात येणार आहे. यावेळी त्यांच्या समवेत निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांची उपस्थिती होती.
सायंकाळी बिनवडे आणि वायाळ यांनी अचानक जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांना भेटी देऊन कामकाज कसे चालते याचा आढावा घेतला. अनेक विभागांमध्ये फाईली अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले.
काही विभागांत तर बिनवडे यांनी कपाट उघडून फाईलींची पाहणी केली.
जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांनी अचानक भेट दिल्याने कर्मचाºयांची मोठी तारांबळ उडाली होती. यापुढेही अशी तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. एकूणच या भेटी दरम्यान अनेक कर्मचारी हे कार्यालयीन वेळ संपण्यापूर्वीच गायब असल्याचे दिसून आल्याने बिनवडे हे नाराज झाले होते. त्यांना तात्काळ नोटीस बजावून खुलासा मागविण्याचे निर्देश त्यांनी सोहम वायाळ यांना दिले.