सीईओंच्या ‘अ‍ॅक्शन’मुळे अधिकारी, कर्मचारी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:24 AM2019-03-27T00:24:16+5:302019-03-27T00:24:48+5:30

कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी आठ जणांचे पथक तयार केले असून, हे पथक दर आठवड्याला आरोग्य केंद्रे, शाळा, अंगणवाड्या व मनरेगाचा कामांना अचानक भेटी देत आहे

Officers and staff feared the CEO's 'action' | सीईओंच्या ‘अ‍ॅक्शन’मुळे अधिकारी, कर्मचारी धास्तावले

सीईओंच्या ‘अ‍ॅक्शन’मुळे अधिकारी, कर्मचारी धास्तावले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी आठ जणांचे पथक तयार केले असून, हे पथक दर आठवड्याला आरोग्य केंद्रे, शाळा, अंगणवाड्या व मनरेगाचा कामांना अचानक भेटी देत आहे. यावेळी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केल्याचे आढळून आले असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, सीईओंच्या या ‘अ‍ॅक्शन’मुळे अधिकारी व कर्मचारी चांगले धास्तावले आहेत. दरम्यान, आरोग्याच्या कामात निष्काळजीपणा करणाºया १२ वैद्यकीय अधिका-यांसह कर्मचा-यांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खंतगावकर यांनी दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी सध्या कामात तेजी आणली असून, कामात हलगर्जीपणा करणा-या अधिकारी व कर्मचा-यांवर त्या कडक अ‍ॅक्शन घेत आहे. यासाठी त्यांनी आठ अधिका-यांची नेमणूक केली आहे. आठवड्यातील एका दिवशी हे अधिकारी आरोग्य केंद्र, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायतीचा कारभार, रोजगारी हमीच्या कामांची पाहणी करत आहेत. यात अधिकारी व कर्मचा-यांनी हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे.
या पथकांनी आतापर्यंत जिल्ह्यातील विविध ठिकाणी तीन वेळेस भेटी दिल्या असून, या भेटीत या पथकाला काही अधिकारी व कर्मचारी कामात हलगर्जीपणा करत असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे या अधिकारी व कर्मचा-यांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या कारवाईमुळे सर्वच अधिकारी व कर्मचा-यांमध्ये धास्ती बसली असल्याचे चित्र सध्या जिल्हाभरात पाहायला मिळत आहे.
दरम्यान, जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळी परिस्थितीत ग्रामस्थांच्या हाताला काम मिळावे, त्यांचे स्थलांतर थांबावे, यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत नागरिकांना कामे देण्यात येत आहे. परंतु, दुष्काळात कामाची मागणी करूनही काही ग्रामसेवक मजुरांना काम देत नाही. तसेच कामाचा सेल्फही तयार करत नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी आठ ग्रामसेवकांची सोमवारीच विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे.
त्या अगोदर शौचालयाचा कामात हलगर्जीपणा करणा-या १३८ ग्रामसेवकांवर वेतनवाढ कमी करण्याची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईमुळे ग्रामसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे.
बडगा : या ठिकाणी झाली कारवाई
या पथकाने वाटूर, पाटोदा, धनगर पिंपळगाव, राणी उंचेगाव, श्रीष्टी, सातोना, माहोरा, टोणगाव या गावातील आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी काही अधिकारी गैरहजर दिसले. तर काही आरोग्य केंद्रांमध्ये औषधी उपलब्ध नसल्याचे आढळून आल्याने १२ वैद्यकीय अधिका-यांसह कर्मचा-यांवर कारवाई करण्यात आली आहे.
कुठे काय आढळले ?
श्रीष्टी येथील आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिका-यांसह कर्मचारी अनुपस्थित आढळले.
धनगर पिंपळगाव येथील वैद्यकीय अधिका-याने १ वर्षांपासून अंगणवाडी तपासली नाही.
पाटोदा येथील आरोग्य केंद्रात नोंद वह्या अद्ययावत नसल्याचे दिसले.
राणीउंचेगाव येथील आरोग्य केंद्रात अस्वच्छता आढळूली.
माहोरा येथील आरोग्य केंद्रात नोंदवह्या अद्ययावत नव्हत्या.
टोणगाव येथे दहा वाजेपर्यंत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आला नसल्याचे दिसून आले.
वाटूर आरोग्य केंद्रातील कर्मचा-यांनी ओंपीडीची फिस भरलीच नाही. तसेच येथे औषधांचा तुटवडाही जाणवला.

Web Title: Officers and staff feared the CEO's 'action'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.