अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामाचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे- जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 01:06 AM2019-08-02T01:06:15+5:302019-08-02T01:06:31+5:30
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जनतेचा विश्वास संपादन करुन महसुली वर्षांतील कामाचे काटेकोरपणे नियोजन करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा समजला जातो. महसूल विभागात काम करीत असताना प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जनतेचा विश्वास संपादन करुन महसुली वर्षांतील कामाचे काटेकोरपणे नियोजन करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले.
महसूल दिनानिमित्त गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित अधिका-यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, स्वामी, सहाय्यक वनसंरक्षक पुष्पा पवार, महसूल संघटनेचे व्ही.डी. म्हस्के, भोजने, महेश सुधाळकर, राजू निहाळ, पी. बी. मते, संजय चंदन, गोरे, वैजनाथ घुगले, व्ही. के. आडे आदींची उपस्थिती
होती.
पुढे बोलताना बिनवडे म्हणाले की, महसूल प्रशासनाकडे विश्वासाने पाहिले जाते. शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी महसूल विभागाकडे आहे. प्रत्येक अधिकारी, कर्मचा-यांने कुठल्याही दबावाला बळी न पडता आत्मविश्वासाने व अभ्यासू वृत्तीने काम करण्याची गरज असून, प्रत्येक अधिकारी, कर्मचा-याने आपल्या वर्षभराच्या कामाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना करत महसूल विभागाचे काम अधिक जलदगतीने व अचूक होण्याच्या दृष्टीकोनातून होण्यासाठी येणाºया काळात महसूल विभागातील अधिकारी व कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महसूल प्रशासनात उत्कृष्ट काम केल्याबद्दल उपविभागीय अधिकारी केशव नेटके, शिवकुमार स्वामी, ब्रिजेश पाटील, तहसीलदार राजाभाऊ कदम, महेश सुधाळकर, मनीषा मेने, सुमन मोरे, गौरव खैरनार, नायब तहसीलदार मयुरा पेरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी तसेच दहावी व बारावीत विशेष प्राविण्य मिळवलेल्या महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचाºयांच्या पाल्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी मोरे यांनी केले तर आभार नायब तहसीलदार स्नेहा कुहिरे यांनी मानले. कार्यक्रमास महसूल विभागातील अधिकारी व कर्मचा-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.