अधिकाऱ्यांनी वाचला विविध समस्यांचा पाढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 12:47 AM2019-12-14T00:47:11+5:302019-12-14T00:47:36+5:30
हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य मतदार संघाचे आमदार अंबादास दानवे यांनी शुक्रवारी जालना नगर पालिकेसह जिल्हा परिषदेच्या कामकाजांचा आढावा घेतला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य मतदार संघाचे आमदारअंबादास दानवे यांनी शुक्रवारी जालना नगर पालिकेसह जिल्हा परिषदेच्या कामकाजांचा आढावा घेतला. यावेळी न.प. तसेच जि.प.च्या सर्व विभागप्रमुखांनी आमदार दानवे यांच्या पुढे समस्यांचा पाढा वाचला. यावेळी न.प. अध्यक्षा संगीता गोरंट्याल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी जिल्हा परिषदेत असलेली रिक्त पदांसह अन्य विविध समस्या अधिवेशनात मांडून त्या सोडव्यात अशी मागणी यावेळी केली.
स्थानिक स्वराज्य मतदार संघातील शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी अधिवेशनापूर्वी प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी ते शुक्रवारी जालना दौºयावर आले होते. त्यांनी सकाळी जालना पालिकेतील पदाधिकारी तसेच अधिकाऱ्यांची बैठक टाऊन हॉल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात घेतली. यावेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी आ. दानवेंचे स्वागत केले. यावेळी पालिकेतील विविध विभागातील समस्यांची मांडणी त्यांच्या समोर केली.
जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत आ. अंबादास दानवे यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनी कोल्हापुरी बंधा-यांच्या देखभाल दुरूस्तीसाठी दहा कोटीची मागणी केली. तसेच वर्ग खोल्यांच्या देखभाल दुरूस्तीसाठी विशेष निधीची गरज असून, एक हजार नवीन वर्ग खोल्यांची गरज असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यातील वाढीव आरोग्य केंद्राचा प्रस्ताव यापूर्वीच शासनाकडे सादर केला आहे, त्याचा पाठपुरावा करण्याची मागणी यावेळी अध्यक्ष खोतकरांनी केली.
तसेच आरोग्य केंद्रातील गैरहजर वैद्यकीय अधिका-यांवर कारवाईचे अधिकार हे मुख्य कार्यकारी अधिका-यांना द्यावेत अशी मागणी यावेळी दानवेंकडे उपाध्यक्ष सतीश टोपे व अन्य सदस्यांनी केली.
या बैठकीला अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, राजू वैद्य, सभापती बनसोडे, रघुनाथ तौर, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, वित्त अधिकारी उत्तम चव्हाण, जि.प. सदस्य जयमंगल जाधव, फुगे, अवधूत खडके यांच्यासह अधिकारी व कर्मचा-यांची उपस्थिती होती.
यावेळी बांधकाम विभाग, पशुवैद्यकीय अधिकाºयांची २१ रिक्त पदे भरणे, बांधकाम विभागात कार्यकारी अभियंत्यासह पाच कनिष्ठ अभियंते आणि कर्मचा-यांची रिक्त पदे आहेत. तसेच समाज कल्याण विभागात १७ मंजूर पदांपैकी केवळ ६ पदे भरली असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी शहा आलम खान, गणेश राऊत यांनीही अंबादास दानवे यांची वैयक्तिक पातळीवर भेट घेऊन चर्चा केली. विष्णू पाचफुले यांच्या निवासस्थानी आ. दानवे यांचा सत्कार करण्यात आला.
जालना पालिका : नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी मांडल्या विविध समस्या
स्थानिक स्वराज्य मतदारसंघाचे आ. अंबादास दानवे यांनी आढावा घेण्यासाठी जी बैठक घेतली प्रथम त्यांचे स्वागत अध्यक्षा गोरंट्याल यांनी स्वागत केले. यावेळी शहरातील विविध समस्या आणि लागणाºया निधीबद्दल गोरंट्याल यांनी दानवेंकडे मागणी केली. आ. दानवे तसेच आ. कैलास गोरंट्याल यांनी मिळून आता शहराच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन त्या ते सोडवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी काँग्रेसचे गटनेते गणेश राऊत, शिवसेनेचे गटनेते निखिल पगारे, राष्ट्रवादीचे नेते शाह आलम खान यांनी दानवेंना समस्यांची माहिती दिली. मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी प्रमुख योजनांसाठी लागणाºया निधीची माहिती दिली. नगरसेवक पाचफुले यांनी नगरसेवकांचे मानधन वाढीसह महानगर पालिके प्रमाणे नगरसेवकांना विशेष निधी दिला जातो तसाच निधी सर्व नगरसेवकांना द्यावा अशी मागणी केली.
सिंचन अधिका-याची कानउघाडणी
सिंचन विभागातील अधिका-यास आज झालेल्या बैठकीत जिल्ह्यात असलेले सिंचन तलाव, कोल्हापुरी बंधारे व त्यांची स्थिती तसेच किती बंधारे विना गेटचे आहेत.
पाझर तलावांच्या नादुरूस्तीची माहिती बैठकीत नीट सांगता न आल्याने आ. अंबादास दानवे यांनी त्या अधिका-याची कान उघाडणी करून किमान आपल्या विभागाची तरी सविस्तर माहिती ठेवावी, अशी आशा व्यक्त केली.