Video: अरे, उठा इथून; 'ते' कागद घेऊन आलेल्या अधिकाऱ्यांना मनोज जरांगेंनी झापलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 08:53 AM2024-02-14T08:53:00+5:302024-02-14T09:35:18+5:30
शिंदे फडणवीस मराठ्यांची फसवणूक करू लागले आहेत, असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे
मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी १० फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण सुरू केले आहे. नवी मुंबईतील वाशी येथे सरकारने काढलेल्या सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा कराव, तत्काळ अधिवेशन बोलावून मराठा समाजाला न्या द्यावा, अशी मागणी करत ते गेल्या ४ दिवसांपासून उपोषणावर बसले आहेत. जरांगे यांच्या उपोषणाचा आज ५ वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळेच, सरकारी अधिकारी जरांगे यांची भेट घेऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, जरांगे यांनी कुठलीही तडजोड नाही, आधी मागण्या पूर्ण करा अन् मगच माझ्याकडे या, अशी भूमिका घेतली आहे.
शिंदे फडणवीस मराठ्यांची फसवणूक करू लागले आहेत, असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे. १५ तारखेचे अधिवेशन २० पर्यंत पुढे का ढकलले असा सवाल करून जरांगे यांनी राजकारण्यांना नीच असा शब्द वापरला आहे. याचबरोबर उद्याच्या उद्या सगेसोयरे असा शब्द असलेला आरक्षणाचा कायदा करावा, अशी मागणीही केली आहे. यावेळी, त्यांची समजूत घालण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना त्यांना इथून निघून जाण्याचं सांगितलं.
जरांगे यांची समजूत घालण्यासाठी अधिकारी आले होते तेव्हा, काय आणलंय, काय नाही ते बघायचं तरी, असे म्हणत अधिकाऱ्याने आपली भूमिका मांडली. ३१ जानेवारी २०२४ पर्यंतचे शासकीय, राजकीय गुन्हे माघारी घेण्याच्या अध्यादेश कमिटीला त्यांनी मुदतवाढ दिलीय. तुमची कालपर्यंतची जी मागणीय ती दिली ना त्यांनी, कमिश्नरही इथं आले आहेत, असे संबंधित अधिकारी म्हणताना व्हडिओत दिसून येत आहे. त्यावर, जरांगे संतापले असून, तुमचं सरकारपाशी वजन बसावं म्हणून मोठेपण सांगताय का, गुन्हे मागे घेतले का ते सांगा?, असा सवाल जरांगे यांनी विचारल. त्यानंतर, यात सरळ सरळ लिहिलंय की गुन्हे मागे घेतले जातील, असे अधिकारी म्हणत आहेत. त्यावर, घेतले जातील, का घेतले आहेत?, असा प्रतिप्रश्न जरांगे यांनी केला आहे. शेण खातो का मी, उठा इथून... अरे उठा इथून, फसवताय का मराठ्याला, असे म्हणत मनोज जरांगे त्यांना समजावण्यास आलेल्या अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकल्याचं दिसून आलं.
संबंधित अधिकारी तेथून निघून गेल्याचंही व्हिडिओ पाहायला मिळत आहे. त्यानंतर, आणखी एक सहकारी त्यांना समजवून सांगत होते. त्यावेळी, माझं डोकं दुखायलंय, व्हा तिकडं. आलात १५ दिवसांतून आणि मला तुकाराम महाराजांसारखं ज्ञान शिकवताय, असे म्हणतही जरांगे यांनी त्यांची समजूत घालणाऱ्याला फटकारलं.
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. यावरून जरांगे यांनी माझा जीव गेल्यावर सरकार राहिल का? महाराष्ट्र राहिल का असे म्हणत महाराष्ट्राची श्रीलंका होईल असे म्हटले. दरम्यान, आज मराठा समाजाकडून बंदची हाक देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी मराठा बांधवांकडून शासकीय कार्यालयात निवेदनही देण्यात आले आहेत.