तेलाच्या दरात भडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:11 AM2021-08-02T04:11:32+5:302021-08-02T04:11:32+5:30
संजय लव्हाडे जालना : जालना बाजारपेठेत सध्या ग्राहक सुस्त आहेत. सोयाबीनसह सर्व प्रकारची खाद्यतेले, तूर, हरभरा, साखर व ड्रायफ्रुट ...
संजय लव्हाडे
जालना : जालना बाजारपेठेत सध्या ग्राहक सुस्त आहेत. सोयाबीनसह सर्व प्रकारची खाद्यतेले, तूर, हरभरा, साखर व ड्रायफ्रुट आणि डाळींच्या दरात तेजी दिसून येत आहे. दुसरीकडे सराफा बाजारात सोन्याचा भाव स्थिर तर चांदीमध्ये मंदी दिसून येत आहे.
सोयाबीनमध्ये आलेली तेजी थांबण्याचे नाव घेत नाही. बुधवारी सोयाबीनमध्ये लोअर सर्कीटनंतर, अप्पर सर्कीट सलग दोन दिवस दिसून आले. एनसीडीएक्सवर सोयाबीनच्या दराने दहा हजारांचा आकडा पार केला आहे. सोयाबीनची आवक खूपच कमी असल्याने भावात विक्रमी तेजी दिसून येत आहे. सोयाबीनच्या वाढत्या आलेखाविषयी बोलायचे झाले तर एका महिन्यात ३५ टक्क्यांची तेजी तर चालू वर्षात १२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशात सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ३९५० रुपये प्रतिक्विंटल आहे तर खुल्या बाजारात आता त्याची किंमत तीनपटीने वाढली आहे. सध्या सोयाबीनला दहा हजारांपेक्षा अधिकचा भाव मिळत आहे. जालना बाजारपेठेत सोयाबीनची दररोज आवक १०० पोती आहे. त्यात १००० रुपये क्विंटलमागे वाढल्यानंतर भाव ९३०० ते ९७०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. दरम्यान, सोयाबीनचे नवीन पीक बाजारपेठेत येण्यास आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सोयाबीनमध्ये आणखी तेजी येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सोयाबीनच्या तेजीमुळे सर्व खाद्यतेलांमध्ये ४०० ते ५०० रुपये क्विंटलमागे वाढले आहेत. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारातही तेलामध्ये मोठी तेजी आहे. सूर्यफूल तेल १६०००, पामतेल १३६००, सोयाबीन तेल १५२००, सरकी तेल १५८००, करडी तेलाचे २२००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर गेले आहेत. ग्राहक नसतानाही तेलाचे भाव मागील काही दिवसांपासून एकतर्फी तेजीत आहेत. जागतिक बाजारपेठेत कच्च्या काजूच्या कमतरतेमुळे गेल्या दोन-तीन महिन्यांत मोठी तेजी आली आहे. कच्चे काजू गेल्या तीन महिन्यांत इंडोनेशियातून ११२५ ते ११५० डॉलरमध्ये आयात केले जात होते. सध्या त्याची खरेदी १८०० डॉलरमध्ये होत आहे. बाजारात तुकडा काजूची कमतरता असून, सध्या सर्व ड्रायफ्रुटमध्ये किलोमागे ५० ते १०० रुपयांपर्यंत तेजी आलेली आहे.
सोन्याचे भाव स्थिर तर चांदीमध्ये मंदी
एका अहवालानुसार अमेरिकेत कोणत्याही वस्तूमध्ये व्याज दरात वाढ होणार नाही. सोन्याच्या बॉण्डमध्ये कोणताही बदल होणार नाही, असे असतानाही डॉलरमध्ये मोठी घसरण झाली आहे. ज्यामुळे सुरक्षित गुंतवणूक लक्षात ठेवून सोन्याचे भाव वाढणार आहेत. सोन्याची मागणी सध्या वाढत आहे. मागणी वाढल्यामुळे वायदा बाजारात एमसीएक्स सोने आणि चांदीमध्ये सुधारणा होत आहे. मात्र, स्थानिक बाजारपेठेत सोन्याचे भाव सध्या स्थिर आहेत. सध्याचे भाव ४९५०० प्रति तोळा, तर चांदीमध्ये किलो मागे १००० रुपयांची मंदी आली असून, भाव ६८००० रुपये प्रतिकिलो आहेत.