घर कोसळून वृद्ध महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 12:45 AM2018-03-07T00:45:19+5:302018-03-07T00:45:26+5:30
एकमजली घर कोसळल्यामुळे ढिगा-याखाली दबून वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. शहरातील राजेंद्रप्रसाद रोडवर मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : एकमजली घर कोसळल्यामुळे ढिगा-याखाली दबून वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. शहरातील राजेंद्रप्रसाद रोडवर मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.
पोलीस सूत्रांनी सांगितले, की नवीन जालन्यातील आरपी रोडवर बालकृष्ण उत्तमराव कुलकर्णी यांचे एकमजली जुने घर आहे. बालकृष्ण कुलकर्णी कामानिमित्त बाहेर होते. घरात त्यांची वृद्ध आई सुशीला उत्तमराव कुलकर्णी (८७) या एकट्याच होत्या.
दुपारीचारच्या सुमारास ही एकमजली इमारत अचानक कोसळली. त्यामुळे सुशीला कुलकर्णी या विटा-मातीच्या ढिगा-याखाली गाडल्या गेल्या. स्थानिकांनी तात्काळ पोलीस व अग्निशमन दलास माहिती दिली. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, सदर बाजार ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव राऊत, रमेश रुपेकर, परदेशी यांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. दोन जेसीबीच्या साहाय्याने ढिगारा दीड तासात मातीचा ढिगारा हटविण्यात आला. तेव्हा सुशीला कुलकर्णी या मातीखाली दबल्याचे आढळून आले. त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारासाठी घेऊन जाताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नवीन व जुना जालना भागात जुन्या जीर्ण झालेल्या इमारतींची संख्या अधिक आहे. यातील अनेक इमारती कालबाह्य झाल्या आहे. नगरपालिका पावासळ्यात या इमारत मालकांना नोटिसा बजावण्याची औपचारिकता पूर्ण करते. प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याने इमारत मालकही याकडे दुर्लक्ष करतात. आजच्या घटनेनंतर तरी या प्रकाराक डे पालिका प्रशासनाने गांभिर्याने लक्ष द्यावी, अशी मागणी होत आहे.