पोलीस ठाण्यात विषारी द्रव प्राशन करून वृद्धाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 11:41 PM2018-02-06T23:41:30+5:302018-02-06T23:41:49+5:30
जालना - जाफराबाद - कुंभारी (ता.जाफराबाद) येथील साहेबराव एकनाथ मिचके (६५) यांनी जाफराबाद पोलीस ठाण्यात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. मात्र, मृत व्यक्ती हा बाहेरूनच विषारी द्रव प्राशन करून ठाण्यात आला होता, असे सांगत पोलीस अधिका-यांनी या प्रकरणात हात झटकण्याचा प्रयत्न केला.
याबाबत प्रत्यक्ष दर्शींनी दिलेल्या माहितीनुसार साहेबराव मिचके हे रात्री आठच्या सुमारास ठाण्यात आले. त्यांनी एका पोलीस कर्मचाºयाच्या नावाचा उल्लेख करीत सोबत आणलेले विषारी द्रव प्राशन केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णलयात दाखल केले. मात्र, उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. जाफराबाद ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार पाटील यांनी सांगितले की, पोलीस ठाण्यात अशी कुठलीही घटना घडली नाही. जाफराबाद ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अक्षय क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात आणलेल्या व्यक्तीने विषारी द्रव प्राशन केले होते, उपचारा दरम्यान, त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक नंदकुमार पाटील यांच्या आदेशनुसार या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेड काँस्टेबल एन. बी.भताने हे करीत आहे. दरम्यान, सालगडी म्हणून काम करणाºया मृत साहेबराव मिचके यांच्या नातेवाईक यांना घडलेल्या घटनेची माहिती रात्री उशिरापर्यंत नव्हती.
वरिष्ठ अधिकाºयांची टाळाटाळ
मृत साहेबराव मिचके यांनी हे टोकाचे पाऊस का उचलले, त्यांचा पोलीस कर्मचाºयाशी कुठल्या प्रकरणाबाबत संबंध होता, पोलिसांनी त्यांना त्रास दिला होता का, याबाबत माहिती देण्यास वरिष्ठ अधिकाºयांनी टाळाटाळ केली. हा घटनाक्रम ठाण्यातील सीसीटीव्हीत कैद झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
साहेबराव मिचके यांनी ठाण्यात येण्यापूर्वीच विषारी द्रव प्राशन केले होते, अशी माहिती जाफराबाद ठाण्यात वरिष्ठ अधिका-यांनी आपणाला दिली आहे. या प्रकरणी सध्या अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली असून, प्रकरणाची योग्य चौकशी केली जाईल.
- रामनाथ पोकळे, पोलीस अधीक्षक, जालना.