ओमायक्राॅनमुळे लावले निर्बंध, राज्यात 'या' स्थितीत लागू शकेल लॉकडाऊन : राजेश टोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 05:22 PM2021-12-25T17:22:49+5:302021-12-25T17:24:49+5:30
Rajesh Tope on omicron variant : ओमायक्राॅनची काळजी म्हणून निर्बंध, वेगळा अर्थ काढू नका
औरंगाबाद : राज्यात ओमायक्राॅन ( omicron variant ) रुग्णांची संख्या शंभराच्या जवळपास पोहचली आहे. ओमायक्राॅनच्या प्रसाराला गती आहे, परंतु भीती बाळगायची गरज नाही, अशी स्पष्टोक्ती आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope on omicron variant ) यांनी दिली. तसेच दिवसाला ८०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज पडेल तेव्हा राज्यात लॉकडाऊन ( Lockdown in Maharashtra ) लागू होईल, अशी शक्यता मंत्री टोपे यांनी ओमायक्राॅनच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू केलेले नवे नियम आणि निर्बंधांची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
लग्न समारंभ, नवीन वर्ष, ख्रिसमस मध्ये गर्दी होऊ नये म्हणून राज्य शासनाने ओमायक्राॅनच्या पार्श्वभूमीवर काळजी म्हणून नवे नियम आणि निर्बंध लावले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते पुढे म्हणाले, ओमायक्राॅनच्या प्रसारात गती आहे पण भिती बाळगायची गरज नाही. यात मृत्यू जरी नसले तरी काळजी घ्यायला हवी. यासाठीच सण, नवीन वर्षाचे स्वागत निर्बंध पाळून करावेत, असे आवाहन ही यावेळी मंत्री टोपे यांनी केले.
तर तिसरी लाट ओमायक्राॅनची असेल
ओमायक्राॅनच्या रुग्णांचा हजाराचा आकडा दुप्पट झाला तर त्याच्या प्रसाराची गती वाढते. सध्या राज्यात ओमायक्राॅनच्या रुग्ण संख्येचा आकडा १०० च्या जवळ गेला आहे. तिसरी लाट आली तर ती ओमायक्राॅनची राहील, अशी शक्यता टोपे यांनी व्यक्त केली. तसेच राज्यात ऑक्सिजनची गरज 800 मेट्रिक टन ऐवढी होईल तेव्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. मात्र, ओमायक्राॅनच्या संसर्गात रुग्णास ऑक्सिजन लागण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती देखील यावेळी टोपे यांनी दिली.
निर्बंधांचा वेगळा अर्थ घेऊ नये
तसेच सर्वांनी सतर्कता बाळगावी, सध्या लागू नियम आणि निर्बंध काळजी म्हणून लावले आहेत. याचा वेगळा अर्थ घेऊ नये. एका वेळी जास्त गर्दी होऊ नये म्हणून ही नियमावली आहे. राज्यात शाळा,हॉटेल ,रेस्टॉरंट पहिल्या सारखेच सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.