अचानक 'डीएचओ' दौऱ्यावर; पाच आरोग्य केंद्राच्या पाहणीत चार डॉक्टरांसह १६ दांडीबहाद्दर समोर

By विजय मुंडे  | Published: October 7, 2022 05:12 PM2022-10-07T17:12:45+5:302022-10-07T17:13:12+5:30

अनुपस्थित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

On a sudden Jalana District Helath Officer tour; 16 employee with four doctors absent in inspection of five health centers | अचानक 'डीएचओ' दौऱ्यावर; पाच आरोग्य केंद्राच्या पाहणीत चार डॉक्टरांसह १६ दांडीबहाद्दर समोर

अचानक 'डीएचओ' दौऱ्यावर; पाच आरोग्य केंद्राच्या पाहणीत चार डॉक्टरांसह १६ दांडीबहाद्दर समोर

Next

जालना : जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. विवेक खतगावकर यांनी गुरूवारी रात्री व शुक्रवारी सकाळी जिल्ह्यातील पाच आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देवून पाहणी केली. या पाहणीत दोन आरोग्य केंद्रातील चार वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १६ कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याचे समोर आले. या दांडीबहाद्दरांवर वेतन वाढ थांबविण्यासह निलंबनाच्या कारवाईची कुऱ्हाड कोसळण्याची चिन्हे आहेत.

काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल यांच्या संकल्पनेतून दांडीबहाद्दरांना चाप लावण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागात क्यूआर कोड स्कॅनिंगद्वारे दैनंदिन हजेरी घेण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे. प्राथमिक स्तरावर जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाच्या कार्यालयात हे क्यूआर कोड लावण्यात आले असून, इतर आरोग्य केंद्रांमध्येही हे क्यूआर कोड लावले जात आहेत. त्यातच आरोग्य सेवा आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान पदाचा कार्यभार तुकाराम मुंढे यांनी स्वीकारताच आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. वरिष्ठांच्या सूचनेनुसार गुरूवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी माहोरा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यावेळी दोन्ही डॉक्टर हजर होते. औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहायक व एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे तिघे अनुपस्थित आढळून आला. मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास डॉ. खतगावकर यांनी सोमठाणा आरोग्य केंद्राला भेट देवून पाहणी केली. त्यावेळी तेथील दोन्ही डॉक्टर अनुपस्थित होते. शिवाय आरोग्य सहायक, आरोग्य सहायिकाही अनुपस्थित असल्याचे दिसून आले.

दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी ९ वाजता रामनगर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देण्यात आली. तेथे दोन्ही डॉक्टर गैरहजर दिसले. ८ आरोग्य सेविका, एक औषध निर्माण अधिकारी, एक संगणक ऑपरेटर अनुपस्थित दिसून आला. त्यानंतर सकाळी १० वाजता कार्ला आरोग्य केंद्राला भेट दिली. तेथे एक डॉक्टर हजर होते तर एक दौऱ्यावर असल्याचे दिसून आले. एक परिचार आमावस्या पौर्णिमेला कार्यालयात येत असल्याचे समोर आले. त्यामुळे परिचराचे वेतन काढू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर रांजणी आरोग्य केंद्राची पाहणी केली असता सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले.

कारवाई केली जाईल 
जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांची अचानक पाहणी करण्यात आली आहे. या पाहणीत अनुपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना नोटिसा देवून कारवाई केली जाईल.
- डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: On a sudden Jalana District Helath Officer tour; 16 employee with four doctors absent in inspection of five health centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.