शेतकऱ्यास अश्रू अनावर, चांगला भाव मिळत असताना इकडं करपा रोगाने खाल्ला टोमॅटो
By विजय मुंडे | Published: July 15, 2023 05:43 PM2023-07-15T17:43:42+5:302023-07-15T17:46:53+5:30
हाती आलेले पीक उपटून बांधावर टाकण्याची वेळ, लाखोंचा खर्च वाया
- फकिरा देशमुख
भोकरदन : बाजारामध्ये टोमॅटोला विक्रमी १२० ते १५० रूपये किलोचा दर मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. परंतु, दुसरीकडे लाखो रूपयांचा केलेला खर्च करपा रोगामुळे मातीत गेल्याचे चित्र भोकरदन तालुक्यातील विविध भागात आहे. रोग पडल्याने टोमॅटो पिकावर दोन लाख रूपयांचा खर्च करणाऱ्या शेतकऱ्यांना हाती आलेले पीक उपटून बांधावर टाकण्याची वेळ आली आहे.
कधी आस्मानी तर कधी सुल्तानी संकटांच्या फेऱ्यात शेतकरी अडकत आहेत. त्यातच मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने, यंदाचा खरीप हंगामही लांबला आहे. भाजीपाला पिकांतून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना पिकांवर पडणाऱ्या रोगराईमुळे फटका बसला आहे. करपा रोगामुळे केवळ पाच दिवसातच पीक बसून जात असल्याने शेतकऱ्यांना उपाययोजना करण्यासाठी वेळही मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
भोकरदन येथील शेतकरी आप्पाराव देशमुख यांनी सांगितले की, शेडनेटमध्ये अर्धा एकर टोमॅटो लागवड केला, त्यासाठी 50 हजार खर्च केला. केवळ पाच कॅरेट निघाले., करपा रोग पडल्याने अख्खे पीक उपटून टाकावे लागले. तर ४० हजार खर्च करून अर्ध्या एकरात टोमॅटो लागवड केलेल्या इब्राहिमपूर येथील गोविंदसिंग भेडरवाल यांचाही अनुभव यापेक्षा वेगळा नाही. करपा रोगामुळे माल लागला नाही, केलेला खर्च निघेल की नाही, अशी परिस्थिती असल्याचे ते म्हणाले. मुठाड येथील राजेंद्र राठी यांनी अडीच एकरावर टोमॅटो लागवड केली. त्यासाठी दोन लाख खर्च केला, मात्र अचानक पूर्ण पिकावर करपा आला व हे पीक होत्याचे नव्हते झाले, त्यामुळे ते उपटून टाकावे लागले, असे राठी यांनी सांगितले.