एकदा लाचेच्या जाळ्यात अडकूनही सुधारणा नाही; हेडकॉन्स्टेबलला एसीबीने पुन्हा घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 11:59 AM2023-04-25T11:59:30+5:302023-04-25T12:00:44+5:30
तपास स्ट्राँग करण्यासाठी पाच हजारांच्या लाचेची मागणी; घरात सापळा लावून हेडकॉन्स्टेबल जेरबंद
जालना : अपघाताच्या गुन्ह्याचा तपास स्ट्राँग करण्यासाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलिस हेड कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारी ताब्यात घेतले. अच्युत गोब्रा पवार (५७, रा. योगेशनगर, जालना) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
तक्रारदार महिलेच्या नातवाचा अपघात झाला होता. याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अच्युत पवार यांच्याकडे होता. सदरील गुन्ह्याचा तपास स्ट्राँग करण्यासाठी पोलिस हेडकॉन्स्टेबल अच्युत पवार यांनी तक्रारदार महिलेकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार महिलेला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संशयिताच्या घरातच सापळा लावला. यावेळी संशयिताने पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे पंचासमक्ष निष्पन्न झाले. पथकाने अच्युत पवार यांना अटक केली आहे. याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, पोलिस उपाधीक्षक सुदाम पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शंकर मुटेकर, पोलिस कर्मचारी गजानन घायवट, गजानन कांबळे, गणेश बुजाडे, प्रवीण खंदारे यांनी केली.
दुसऱ्यांदा लाचेच्या जाळ्यात
अच्युत पवार यांना या अगोदरही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच स्वीकारतांना पकडले होते. त्यानंतर त्यांच्यावर आता दुसऱ्यांदा कारवाई झाली आहे, अशी माहिती पोनि. शंकर मुटेकर यांनी दिली.