दीड लाखाचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 01:40 AM2020-02-19T01:40:12+5:302020-02-19T01:40:43+5:30
पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाने सोमवारी तीन ठिकाणी केलेल्या कारवाईत १ लाख ६५ हजार ५२५ रूपयांचा गुटखा जप्त केला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाने सोमवारी तीन ठिकाणी केलेल्या कारवाईत १ लाख ६५ हजार ५२५ रूपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणात पाच जणांविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कदीम पोलीस ठाण्यातील सपोनि पी.ए. पोवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी सकाळी जुना जालना भागात एका रिक्षावर (क्र.एम.एच.२१ - एक्स.५८६९) कारवाई करून गुटखा जप्त केला. अन्न सुरक्षा अधिकारी व. ता. रोडे यांनी पंचनामा केल्यानंतर ४४ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल असल्याचे समोर आले. या प्रकरणी सय्यद मोबीन सय्यद अफसर व मोहम्मद तन्वीर अब्दुल खालेद मोमीन या दोघांविरूध्द कदीम ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंदनझिरा पोलीस ठाण्यातील सपोउपनि पी.सी. कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी सकाळी एका वाहनावर (क्र. एम.एच.१७- ए. झेड.६६७७) कारवाई करून गुटखा जप्त केला. अन्न सुरक्षा अधिकारी व. ता. रोडे यांनी पंचनामा केल्यानंतर पकडलेला मुद्देमाल १ लाख २० हजार ०६० रूपयांचा असल्याचे समोर आले. या प्रकरणी दगडू रावसाहेब राठोड, अब्दुल रहेमान अब्दुल नबी बागवान या दोघांविरूध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा विभागाचे सहायक आयुक्त एस. ई. देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी सं. ना. चट्टे, नि.सू. कुलकर्णी यांनी सोमवारी दुपारी भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील ज्ञानेश्वर आहेर याच्या घरावर कारवाई केली.
या कारवाईत १ हजार ६५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही कारवाईत एकूण १ लाख ६५ हजार ५२५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकाच दिवशी तीन ठिकाणी केलेल्या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.