साडेअकरा लाखांचा मुद्देमाल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 00:50 IST2019-12-14T00:50:18+5:302019-12-14T00:50:43+5:30
एका घरासह एक दुकान फोडून चोरट्यांनी जवळपास साडेअकरा लाखाचा मुद्देमाल लंपास केला

साडेअकरा लाखांचा मुद्देमाल लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
उटवद : जालना तालुक्यातील एका घरासह एक दुकान फोडून चोरट्यांनी जवळपास साडेअकरा लाखाचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना तालुक्यातील उटवद येथील दीपक भाऊराव शिंदे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील तिजोरीत असलेले ११ लाख ५० हजार रूपयांचे दागिने शुक्रवारी पहाटे चोरून नेले. तसेच रामेश्वर रंगनाथ गव्हाळे यांच्या किराणा दुकानाचे कुलूप तोडून दुकानाच्या गल्ल्यातील चिल्लरसह रोख रक्कम असा जवळपास दोन हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान, शिंदे यांचे घर फोडण्यापूर्वी चोरट्यांनी शेजारील घरांच्या बाहेरून कड्या लावल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी बांगर, सपोनि फुलचंद मेंगडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. घटनास्थळी फिंगर प्रिंट, डॉगस्कॉडला बोलाविण्यात आले होते.
श्वानाने घटनास्थळापासून १०० मीटर अंतरापर्यंत माग काढला. या प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाधिकारी सपोनि फुलचंद मेंगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणात तीन संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाचा लवकरच उलगडा होईल, असे पोलिसांनी सांगितले.