काँग्रेसच्या शिबिरात दीड हजार कार्यकर्त्यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:32 AM2018-02-11T00:32:48+5:302018-02-11T00:33:06+5:30
१५ फेब्रुवारी रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात सुमारे दीड हजार कार्यकर्त्यांचा सहभाग राहणार असल्याची माहिती काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया व माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
जालना : येथील बगडिया हॉटेलमध्ये १५ फेब्रुवारी रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात सुमारे दीड हजार कार्यकर्त्यांचा सहभाग राहणार असल्याची माहिती काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया व माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
माजी आ. जेथलिया म्हणाले की, या शिबिरास राज्य प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नाना पटोले, खा. राजीव सातव, माजी मंत्री नसीम खान यांच्यासह सर्व आघाड्यांचे प्रदेशाध्यक्ष तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शिबीर हे शिस्तबध्द पध्दतीने करण्याचा पक्षाचा प्रयत्न असून या शिबिरात पक्षाचे आजी- माजी आमदार, खासदार, माजी मंत्री, पक्षाचे प्रदेश, विभाग, जिल्हा, तालुका आणि शहर पातळीवरील सर्व आघाड्यांचे आजी - माजी पदाधिकारी तसेच पक्षाचे आजी- माजी नगरसेवक, जि. प. पं. स. सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्त्यांचा सहभाग राहणार असल्याचे जेथलिया यांनी सांगितले. माजी आ. गोरंट्याल म्हणाले की, या शिबिराच्या निमित्ताने एक दिवस अगोदर पक्षाचे नेते मंडळी जालना शहरात दाखल होणार असून शहरातील उद्योजक, व्यापारी, डॉक्टर, वकील, सी.ए. यांच्यासह विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित मान्यवरांशी संवाद साधणार आहेत. शिबीर यशस्वी करण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून, या शिबिरात लोकसभा, विधानसभेचे संभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्यात येणार असून नेते मंडळी उमेदवारांविषयी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मत जाणून घेणार आहेत. प्रदेश सचिव विजय कामड म्हणाले की, पक्षात असलेल्या परंतु नेते मंडळींशी समन्वय नसल्याने दुरावलेल्या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या शिबिराच्या निमित्ताने पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या वेळी प्रा. सत्संग मुंडे, राम सावंत, राजेंद्र राख, समाज कल्याण सभापती दत्तात्रय बनसोडे, मंठा तालुकाध्यक्ष किसनराव मोरे, शेख महेमूद आदींची उपस्थिती होती.