शेतात गाय चारण्यावरून वाद पेटला; रॉड, कुऱ्हाडीने मारहाणीत एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 02:45 PM2023-01-06T14:45:19+5:302023-01-06T14:46:01+5:30
करंजळा येथील धक्कादायक घटना, सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल
जालना, सुखापुरी : शेतात गाय चारण्याच्या कारणावरून एकाला लोखंडी रॉड, कुऱ्हाडीने वार करून ठार मारल्याची धक्कादायक घटना अंबड तालुक्यातील करंजळा येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली. रामा पिराजी घुले (४८, रा. करंजळा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी अभिषेक घुले यांच्या फिर्यादीवरून अशोक रामा सावंत, लहू रामा सावंत, रामेश्वर अशोक सावंत, दत्ता लहू सावंत, शंकर लक्ष्मण धुमक, भगवान लक्ष्मण धुमक (सर्व रा. करंजळा) या संशयितांविरुद्ध गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबड तालुक्यातील करंजळा येथे शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी हातात कुऱ्हाडी, लोखंडी रॉड व काठ्या घेऊन राम घुले यांच्या घरासमोर आले. संशयित अशोक सावंत हा फिर्यादीला म्हणाला की, ‘तुझा बाप माझ्या शेतात जनावरे सोडून आमच्या शेतीचे व पिकांचे नुकसान करतो. त्याला आता आम्ही जिवंत सोडणार नाही,’ असे म्हणून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तेव्हा रामा घुले हे समजावून सांगण्यास गेले असता, संशयित रामेश्वर सावंत याने हातातील कुऱ्हाडीने घुले यांच्यावर वार केले. त्यानंतर संशयितांनीही कुऱ्हाड, लोखंडी रॉड व काठीने रामा घुले यांना मारहाण केली. यात रामा घुले हे रात्री उशिरा मयत झाले. गुरुवारी सकाळी नातेवाईकांनी याची माहिती गोंदी पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलिस ठाण्याचे सपोनि. सुभाष सानप हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घुले यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
सर्व आरोपी ताब्यात
घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. सर्व आरोपींना गावातूनच ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळाला अंबडचे उपविभागीय पोलिस अधिकारी, सपोनि. सुभाष सानप यांच्यासह मदन गायकवाड, संदीप कुटे, नागरगोजे यांनी भेट दिली.
१५ दिवसांत चार घटना
जिल्ह्यात खुनांची मालिकाच सुरू आहे. गेल्या १५ दिवसांत जवळपास चार घटना घडल्या आहेत. यात जालना शहरातील शंकरनगर येथे पतीने पत्नीचा खून केला. तर भोकरदन येथे पतीने अपघाताचा बनाव करून पत्नीला ठार केले. त्या अगोदर भोकरदन येथेच शेजारी राहणाऱ्या महिलेने वृद्ध महिलेचा खून केला. त्यानंतर आता करंजळा येथे एकाचा खून करण्यात आला.