एकच पर्व.. ओबीसी सर्व...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:32 AM2021-01-25T04:32:18+5:302021-01-25T04:32:18+5:30

जालना : मोर्चेकऱ्यांनी केलेली पारंपरिक वेशभूषा आणि सादर केलेली कला... स्वयंसेवकांकडून ठिकठिकाणी केले जाणारे नियोजन, पुरविली जाणारी सेवा... मल्लखांबाचे ...

One episode .. OBC all ... | एकच पर्व.. ओबीसी सर्व...

एकच पर्व.. ओबीसी सर्व...

Next

जालना : मोर्चेकऱ्यांनी केलेली पारंपरिक वेशभूषा आणि सादर केलेली कला... स्वयंसेवकांकडून ठिकठिकाणी केले जाणारे नियोजन, पुरविली जाणारी सेवा... मल्लखांबाचे प्रात्यक्षिके आणि एकच पर्व.. ओबीसी सर्व.. ऊठ ओबीसी जागा हो.. संघर्षाचा धागा हो... अशा गगनभेदी घोषणांनी रविवारी जालना शहर दुमदुमून गेले. शहरात प्रवेश करणाऱ्या विविध मार्गांवर केवळ ओबीसी मोर्चासाठी येणारे युवक, ज्येष्ठांसह महिलांचा ताफाच दिसून येत होता.

ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी, यासह इतर विविध मागण्यांसाठी रविवारी जालना शहरात राज्यव्यापी विशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जालना जिल्ह्यातीलच नव्हे, तर शेजारील बुलडाणा, औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणीसह राज्याच्या विविध कानाकोपऱ्यांतून ओबीसी बांधव सहभागी झाले होते. शहरात प्रवेश करणाऱ्या विविध मार्गावर रविवारी सकाळी केवळ आंदोलकांचीच वाहने शहरात प्रवेश करताना दिसत होती. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून या मोर्चाला सुरुवात होणार होती. येथे सकाळी नऊ वाजल्यापासूनच मोर्चेकरी येणाऱ्यास सुरुवात झाली होती. येथील व्यासपीठावरून मोर्चास येणाऱ्या युवक, महिलांसह ज्येष्ठांचे स्वागत केले जात होते. या मोर्चात सहभागी झालेल्या विविध जातीतील मोर्चेकरी महिला, पुरुष, युवकांनी आपापल्या पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे, केवळ वेशभूषाच नव्हे, तर आपल्या पारंपरिक कला सादर करीत या मोर्चातील उत्साह वाढविण्याचे काम अनेकांनी केले.

सकाळी सुरू होणारा मोर्चा दुपारी एक वाजेच्या सुमारास सुरू झाला. परंतु, मोर्चेकऱ्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह थोडाही कमी झाला नव्हता.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. एकच पर्व.. ओबीसी सर्व.. ओबीसींची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागिदारी, ओबीसी आता जागा झाला, संघर्षाचा धागा झाला, संघर्ष आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, देख लेना आँखोसे, आये है हम लाखोंसे अशा एक ना अनेक गगनभेदी घोषणा युवकांसह महिला देत होत्या. शहरातील कादराबाद, मस्तगड, गांधीचमन, शनीमंदिर, उड्डाणपूल, नूतन वसाहत या मार्गे जावून जांगडा पेट्रोलपंपाच्या मागील प्रांगणात या मोर्चाचा समारोप करण्यात आला.

ठिकठिकाणी पाण्याची सोय

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जांगडे पेट्रोलपंपाच्या पाठीमागील मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी युवक, ज्येष्ठांसह महिला बालकांची गैरसोय होवू नये, यासाठी ठिकठिकाणी सामाजिक संस्थांकडून पिण्याच्या पाण्याची सोय केली होती.

महिला, युवतींचाही उत्साह

मोर्चा यशस्वी करण्यासाठी केवळ पुरुषांनीच नाही तर महिला, मुलींनीही मोठी तयारी केली होती. याची प्रचीती रविवारी सकाळी शहरवासियांना आली. या मोर्चात सहभागी महिला, मुलींनीही विविध वेशभूषा साकारल्या होत्या. विशेष म्हणजे, गटागटाने येणाऱ्या महिलांनीही ओबीसीच्या मागण्यासंदर्भात गगनभेदी घोषणा देवून शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते.

ठिकठिकाणी अल्पोपाहाराची सोय

मोर्चाचे नियोजन करतानाच समन्वय समितीने बाहेरगावाहून येणाऱ्या मोर्चेकऱ्यांसाठी ठिकठिकाणी अल्पोपाहाराची सोय केली होती. सभास्थळीही अनेकांनी मोर्चात सहभागी नागरिकांना केळींसह इतर फळांचे वाटप केले.

स्वयंसेवकांकडून स्वच्छता मोहीम

मोर्चा सुरू झाल्यानंतर होणाऱ्या कचऱ्याचे संकलन करण्यासाठी असंख्य युवक मोर्चाच्या पाठीमागे काम करीत होते. नगर परिषदेचे वाहनही या कचऱ्याचे संकलन करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. विशेषत: सभेतील भाषणे झाल्यानंतरही स्वयंसेवकांनी शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीम राबविली.

पोलिसांचा बंदोबस्त

ओबीसींच्या राज्यव्यापी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा- सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी शहरातील विविध भागांत चोख बंदोबस्त तैनात केला होता. बंदोबस्तावर तैनात पोलीस मोर्चाच्या मार्गावरील वाहतूक वळवून मोर्चाला येणारा अडथळा दूर करीत होते.

महिलांसाठी वाहनांची सोय

मोर्चात शहरासह परिसरातील महिला, मुली मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मोर्चाची समाप्ती झाल्यानंतर या महिलांना घरी सोडण्यासाठी विशेष वाहनांची सोय करण्यात आली होती. यासाठी ओबीसीमधील पदाधिकाऱ्यांसह समन्वय समितीने पुढाकार घेतला होता.

Web Title: One episode .. OBC all ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.