जालन्यात पीटलाइनसाठी शंभर एकर जागा उपलब्ध, तर औरंगाबादेत नव्याने करावी लागेल खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 01:11 PM2022-01-17T13:11:40+5:302022-01-17T13:14:44+5:30
Railway Pitline पीटलाइनची उभारणी आणि रेल्वेची चाके निर्मितीचा प्रकल्प जालन्यातच व्हावा, अशी आग्रही मागणी रेल्वे संघर्ष समितीने केली आहे.
जालना : जालना हे पूर्वीपासून भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थानावर आहे. त्यामुळे निजाम काळापासूनच रेल्वेला मोठे महत्त्व होते. येथे रेल्वेची जवळपास शंभर एकर जागा उपलब्ध आहे. त्यामुळे पीटलाइनची ( Railway Pitline ) उभारणी आणि रेल्वेची चाके निर्मितीचा प्रकल्प जालन्यातच व्हावा, ही आमची आग्रही मागणी आहे. औरंगाबादेत रेल्वेला शंभर एकर जागा नव्याने खरेदी करून तेथे पीटलाइन उभारावी लागणार असल्याची माहिती रेल्वे संघर्ष समितीने रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यात पंधरा दिवसांपूर्वी किसान रेल्वेच्या शुभारंभप्रसंगी पीटलाइन जालन्यातच होईल, असे सूचक वक्तव्य केले होते. त्यावरून मोठा गदारोळ उठला आहे. औरंगाबाद येथील काही जण ही पीटलाइन औरंगाबादला होणार होती. मात्र, ती रेल्वे राज्यमंत्री दानवेंनी पळविली, असे बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यात माजी मंत्री फौजिया खान यांनीही जी प्रतिक्रिया दिली ती चुकीची असून, त्यांना या प्रश्नावर बोलण्याचा अधिकार नसल्याची माहिती रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेशलाल चौधरी यांनी दिली. जालना ते खामगाव हा रेल्वेमार्ग व्हावा, ही जुनीच मागणी आहे. याचे दोन वेळा सर्वेक्षणही पूर्ण झाले; परंतु तो फिजिबल नसल्याचा अहवाल दिला आहे; परंतु वास्तव वेगळेच असून, जालना ते खामगाव हा रेल्वेमार्ग झाल्यास जालना हे थेट उत्तर भारताशी जोडले जाऊन त्याचा मोठा लाभ उद्योगवाढीसह प्रवाशांना होणार आहे. आता अंतिम सर्वेक्षणासाठी दानवे यांनी तीन कोटी ७५ लाख रुपयांचा निधी दिला आहे.
त्यामुळे या सर्वेक्षणाकडे लक्ष लागून आहे. हा सर्व्हे सकारात्मक येईल, अशी आमची आशा असल्याचेही चौधरी म्हणाले. यावेळी सोलापूर ते जळगाव या रेल्वे लाइनबद्दलही संघर्ष समितीने दहा वर्षांपासून पाठपुरावा केला. त्याचे सर्वेक्षण पूर्ण होऊन ती जालन्यातून नेल्यावर कशी आर्थिक लाभदायी आहे, हे स्पष्ट होते; परंतु ही रेल्वे औरंगाबाद येथून न्यावी, असा आग्रह केला होता. नंतर हा प्रकल्प बारगळला आहे. त्यासाठीदेखील आम्ही दानवेंकडे पाठपुरावा करू, असे फेरोज अली मैालाना यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस गेंदालाल झुंगे, डॉ. राधेश्याम जयस्वाल, डॉ. करवा, सुरेश सद्गुरे, बाबूराव सतकर, अभय यादव आदींची उपस्थिती होती.