अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 01:10 AM2018-05-01T01:10:51+5:302018-05-01T01:10:51+5:30
अज्ञात वाहनाने धडक दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकठार तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : अज्ञात वाहनाने धडक दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकठार तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. भोकरदन-जाफराबाद रस्त्यावरील विरेगावजवळ सोमवारी दहाच्या सुमारास ही घटना घडली. सोमीनाथ रामराव शेळके (२८ रा. प्रल्हादपूर), असे मृत युवकाचे नाव आहे, तर गंभीर जखमी रामेश्वर साहेबराव बरडे (२६) औरंगाबाद ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रल्हादपुर येथील सोमीनाथ रामराव शेळके व फत्तेपुर येथील रामेश्वर साहेबराव बरडे हे दोघे दुचाकीवरून (एमएच २० सीडी ७७२) कामानिमित्त विरेगावकडे जात होते. सकाळी दहा वाजेच्या सुमारास विरेगावजवळ पाठीमागून येणाऱ्या अज्ञात अवजड वाहनाने दुचाकीला धडक दिली. त्यामळे दोघांनाही जबर मार लागला.
अपघातानंतर वाहनचालक न थांबता तसाच निघून गेला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर साखळे, गणेश पायघन, देवकर, विजय जाधव हे घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, याच वेळी शिवसेनेचे मनिष श्रीवास्तव हे पारधकडून भोकरदनकडे जात असताना त्यांनी तातडीने दोन्ही युवकांना आपल्या वाहनातून भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्यामुळे दोघांवर प्रथमोपचार करून तातडीने ओरंगबादला हलविण्यात आले. डोक्याला जबर मार लागल्यामुळे सोमीनाथ शेळके याचा रस्त्यातच मृत्यू झाला. तर रामेश्वर बरडे याच्यावर भोकरदन येथ प्रथमोपचारकरून पुढील उपचारासाठी औरंगबादला हलविण्यात आले. सोमिनाथ शेळके याच्यावर प्रल्हादपूर येथे सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अपघात घडल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी काहीजण फोटो घेण्यासह शुटिंग करण्यातच मग्न राहिले. त्यामुळे अपघातग्रस्त दोघेही अर्धा तास रस्त्यावर तसेच पडून होते, असे सूत्रांनी सांगितले. तातडीने उपचार मिळाले असते तर सोमिनाथचे प्राण वाचले असते.