झोपेत असताना भिंत कोसळून एक ठार; चार बकऱ्यांचाही मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 07:46 PM2021-09-25T19:46:37+5:302021-09-25T19:46:57+5:30
बाजीराव गवळी यांना एक एकर जमीन असून, ते टेलरींग व्यवसाय व बकऱ्यांचे संगोपन करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होते.
राजूर : पत्राच्या शेडवर भिंत कोसळून झोपेत असलेल्या एका इसमासह चार बकऱ्या ठार झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील चांधई एक्को येथे शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली. बाजीराव बाबुराव गवळी (५१) असे मयताचे नाव आहे.
चांधई एक्को येथील मुरलीधर दादाराव ढाकणे यांच्या घराच्या शेजारी बाजीराव बाबुराव गवळी यांचे पत्राचे शेड आहे. शेडमध्ये ते शुक्रवारी सांयकाळी नेहमी प्रमाणे झोपले होते. सध्या राजूर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुरलीधर ढाकणे यांच्या घराची भिंत शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास कोसळून पत्राच्या शेडवर पडली. यात बाजीराव गवळी यांच्यासह बकऱ्या मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या. आसपासच्या नागरिकांनी मदतकार्य करून बाजीराव गवळी यांना ढिगाऱ्याच्या बाहेर काढले. त्यानंतर राजूरच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी नेतांना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
बाजीराव गवळी यांना एक एकर जमीन असून, ते टेलरींग व्यवसाय व बकऱ्यांचे संगोपन करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होते. घरातील कर्ता गेल्याने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. घटनास्थळी तलाठी पल्लवी मानकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर. ई. तायडे, सरपंच अनिता तळेकर यांनी भेट देवून पंचनामा केला आहे. याप्रकरणी राजूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक फौजदार शिवाजीराव देशमुख हे करीत आहेत.