एक लाख विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:23 AM2019-07-09T00:23:27+5:302019-07-09T00:23:54+5:30
नवीन शैक्षणिक वर्षाला सुरूवात होऊन २१ दिवसांचा कालावधी लोटला तरी जिल्ह्यातील १ लाखावर विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा आहे
दीपक ढोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र, नवीन शैक्षणिक वर्षाला सुरूवात होऊन २१ दिवसांचा कालावधी लोटला तरी जिल्ह्यातील १ लाखावर विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा आहे. मात्र, जिल्ह्यातील काही शाळांनी अद्यापही विद्यार्थ्यांची, निधीची माहिती न दिल्याने ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
शाळेतील सर्व मुलींना आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शासनाच्या सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून गणवेश उपलब्ध करून दिले जात होते. परंतु, यावर्षी शासनाने नवीन अध्यादेश काढून समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे ठरविले आहे. तसेच शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे शासनाचे आदेश होते. त्यानुसार शाळेच्या मुख्याध्यापकांच्या खात्यात ही रक्क्म जमा करावी लागणार आहे. यासाठी जिल्ह्याला ७ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.
दरम्यान, शाळा सुरु होऊन २१ दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्यापही जिल्हाभरातील १ लाख ८ हजार ७१० विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आलेला नाही. याबाबत समग्र शिक्षा अभियानाच्या विभाग प्रमुख स्नेहलता सोळुंके यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, शाळांच्या खात्यात असलेला निधी वजा करुन विद्यार्थ्यांनुसार ही रक्कम शाळांच्या खात्यात टाकण्यात येणार आहे.
त्यानुसार समग्र शिक्षा अभियानाच्या वतीने शाळांना निधीची माहिती देण्याचे सांगण्यात आले आहे. अद्याप काही शाळांची माहिती येणे बाकी आहे. दरम्यान, जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना गणवेश देणे गरजेचे आहे.
चार दिवसांत निधी
जिल्हाभरात जवळपास १५०० शाळा आहे. या सर्व शाळांना निधीची माहिती देण्याचे आदेश समग्र शिक्षा अभियानाच्यावतीने देण्यात आले होते. अद्याप जवळपास १४१० शाळांनी माहिती दिली असून, ९० शाळांनी अद्यापही निधीची माहिती दिली नसल्याचे विभाग प्रमुख सोळुंके यांनी सांगितले. दरम्यान, या शाळांना सोडून प्रस्ताव तयार करण्यात आला असून, येत्या चार दिवसांत मुख्याध्यापकांच्या खात्यात निधी जमा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.