लाखाच्या दुचाकीची दहा हजारांत विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:33 AM2021-09-23T04:33:30+5:302021-09-23T04:33:30+5:30
जालना : जालना शहरासह औरंगाबाद, नाशिक व इतर जिल्ह्यांतून चोरलेल्या लाखोंच्या दुचाकी दहा ते वीस हजारांमध्ये विक्री करणाऱ्या संशयितास ...
जालना : जालना शहरासह औरंगाबाद, नाशिक व इतर जिल्ह्यांतून चोरलेल्या लाखोंच्या दुचाकी दहा ते वीस हजारांमध्ये विक्री करणाऱ्या संशयितास स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी जेरबंद केले. त्याच्याकडून एक दोन नव्हे तब्बल २६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
रामधन स्वरूपचंद बालोद (रा. शिंदेबनवाडी, ता. भोकरदन), पवन प्रताप इंगळे (रा. पळसखेडा पिंपळे, ता.भोकरदन) अशी ताब्यात घेतलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. जालना शहरासह जिल्ह्याच्या विविध भागातून दुचाकी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे. दुचाकीचोरांचा बंदोबस्त करण्यासाठी गुन्हे शाखेचे विशेष पथक तपास करीत होते. या पथकाला पळसखेडा पिंपळे येथील रामधन बालोद याचा दुचाकी चोरीत हात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने बालोद याला ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिसांनी खाक्या दाखविताच बालोद याने दुचाकीचोरीची माहिती दिली. तसेच त्याचा सहकारी पवन प्रताप पिंपळे याच्यासह इतर साथीदारांच्या मदतीने दुचाकींचे हॅण्डल लॉक तोडून त्यांची चोरी करीत असल्याचे सांगितले. चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी भोकरदन तालुका व परिसरातून तब्बल २६ दुचाकी जप्त केल्या आहेत. संबंधितांनी जालना, औरंगाबाद, नाशिकसह राज्याच्या विविध भागांतून दुचाकींची चोरी केल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोनि. सुभाष भुजंग, पोउपनि दुर्गेश राजपूत, प्रमोद बोंडले, हवालदार सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, सुधीर वाघमारे, सचिन चौधरी, प्रशांत लोखंडे, जगदीश बावणे, रवी जाधव यांच्या पथकाने केली.
कागदपत्रांचा पत्ता नाही
चोरलेल्या दुचाकीसंबंधित संशयित गरजू व्यक्तींना दहा ते वीस हजार रुपयांमध्ये विक्री करीत होते. विशेषत: त्यांच्याजवळचे काही लोक या भामट्यांच्या जाळ्यात अडकल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जुन्या दुचाकी खरेदी करताना कागदपत्रांची पडताळणी करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी केले आहे.
१७ गुन्ह्यांचा उलगडा
गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीमध्ये तब्बल १७ दुचाकीचोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. यामध्ये जालना जिल्ह्यातील ९ आणि इतर जिल्ह्यातील ८ अशा एकूण १७ गुन्ह्यांचा समावेश आहे. इतर दुचाकींच्या चोरीचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
फोटो