दुचाकी अपघातात एक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 01:10 AM2019-05-22T01:10:10+5:302019-05-22T01:10:26+5:30
आष्टी येथे शेगाव- पंढरपूर रस्त्याच्या कामासाठी मुरूम वाहून नेत आसलेल्या हायवा टिप्पर आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : तालुक्यातील आष्टी येथे शेगाव- पंढरपूर रस्त्याच्या कामासाठी मुरूम वाहून नेत आसलेल्या हायवा टिप्पर आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
हा अपघात मंगळवारी दुपारी १२ च्या दरम्यान आष्टी - गाव ते मोंढा चौफुली दरम्यान झाला.
गावातून दुचाकीवर सातोना येथील राजू गणपतराव उकाडे (वय २७ रा. सातोना खुर्द) आणि सुनील भीमराव आठवे (वय २२ रा. रेवळगाव ता. सेलू जि. परभणी) हे दोघे आष्टी येथून सातोना येथील विवाहासाठी कपडे घेऊन जात होते.
त्याचवेळी पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकी हायवा टिप्पर क्रमांक एम. एच. ५५ यू ७७८८ ची धडक बसून दुचाकी हायवा च्या पाठीमागील टायर खाली सापडल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेला सुनील आठवे याच्या डोक्यावरून टायर गेल्याने तो जागीच ठार झाला तर राजू उकाडे हा जखमी झाला.
या प्रकरणी राजू आठवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात हायवा चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि विनोद इज्जपवार हे करीत आहेत. यापूर्वीही या मार्गावर अनेक लहानमोठे अपघात घडल्याचे सांगण्यात आले.