जालना जिल्ह्यात एक हजार कोटींची कर्जमुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:28 AM2021-01-22T04:28:38+5:302021-01-22T04:28:38+5:30
विजय मुंडे जालना : राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आजवर जिल्ह्यातील तब्बल एक लाख ६२ हजार ...
विजय मुंडे
जालना : राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आजवर जिल्ह्यातील तब्बल एक लाख ६२ हजार ४९१ कर्जखाती कर्जमुक्त झाली आहेत. या कर्जखात्यावरील १०२० कोटी ६५ लाख रुपयांचे कर्ज माफ झाले आहे.
अस्मानी, सुलतानी संकटांचा फेरा, शेतकऱ्यांची विस्कटलेली आर्थिक घडी या पार्श्वभूमीवर शासनाने डिसेंबर २०१९ मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील एक लाख ८३ हजार ४० शेतकऱ्यांची कर्जखाती बँकांच्या वतीने शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. याद्यांच्या छाननीनंतर शासनाकडून सात याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. या याद्यांमध्ये एक लाख ७२ हजार ११७ शेतकऱ्यांचे कर्जखाते विशिष्ट क्रमांकासह प्रसिद्ध करण्यात आले होते. शासनाकडून या याद्या आल्यानंतर तब्बल एक लाख ७२ हजार ११७ कर्ज खात्याचे शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले आहे. आधार प्रमाणिकरण केलेल्या कर्ज खात्यांपैकी एक लाख ६२ हजार ४९१ कर्ज खात्यावरील तब्बल १०२० कोटी ६५ लाख रूपयांची रक्कम शासनाकडून शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर वर्ग करण्यात आली आहे. प्रमाणिकरण झालेल्या उर्वरित कर्जखात्यांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, कर्जमुक्ती यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांपैकी अद्याप ५ हजार ५८५ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केलेले नाही. त्यामुळे त्यांची कर्जमुक्तीची रक्कम मिळण्याची प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे.
४११७ ऑनलाईन तक्रारी
कर्जमुक्तीसाठी आजवर ४११७ जणांनी ऑनलाईन तक्रारी नोंदविल्या आहेत. जिल्हा समितीकडे प्राप्त तक्रारींपैकी २२४० तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे, तर सात तक्रारी प्रलंबित आहेत. तालुकास्तरावर १८५२ तक्रारींचे निरसन करण्यात आले असून, १८ तक्रारी प्रलंबित आहेत.
आधार प्रमाणिकरण करावे
ज्या शेतकऱ्यांची नावे शासनाकडून विशिष्ट क्रमांकासह प्रसिद्ध झालेल्या यादीत समाविष्ट आहेत, त्या लाभार्थ्यांनी वेळेत आधार प्रमाणिकरण करावे. ज्या लाभार्थी शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असेल, त्यांच्या वारसांनी बँकांच्या नियमानुसार कागदपत्रे सादर करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा.
नानासाहेब चव्हाण
जिल्हा उपनिबंधक, जालना