कांदा चाळीचे अनुदान खर्च न करताच संपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:39 AM2019-03-26T00:39:16+5:302019-03-26T00:39:46+5:30
अनुदानपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग न करता खर्च झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत यंदाच्या आर्थिक वर्षात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कांदा चाळ उभारणीची फाईल मंजुरीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांनी पूर्वसंमती देऊन फाईल मंजूर करण्यात आल्या होत्या. यासाठी लागणाऱ्या १ कोटी ७७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. परंतु, अनुदानपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग न करता खर्च झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शेतक-यांच्या कांदा चाळ अनुदानाच्या १७१ फाईल कृषी विभागाच्या गलथान कारभारामुळे तीनदा परत येऊन चौथ्यांदा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने परिपूर्ण करून त्या मंजुरीसाठी जिल्हा कृषी कार्यालयाकडे पाठविल्या होत्या.
आतापर्यंत जाफराबाद तालुक्यातील शेतक-यांना अनुदानाचा लाभ मिळाला नसून कृषी विभागाच्या मनमानी कारभारामुळे लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
शेतक-यांनी उसनवारीवर पैसे जमा करून कांदाचाळ उभी केली आहे. यामुळे खर्च केलेले पैसे मार्च अखेरीस मिळतात की नाही, याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे शेतक-यांचा अनुदान निधी कुठे खर्च झाला, याची माहिती लाभार्थ्यांना देणे आवश्यक आहे. तसेच हा निधी इतरत्र तर वळविला तर नाही ना अशी चर्चा सुरू आहे.
तालुका कृषी कार्यालय आणि जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय यांच्यात फाईल पाठविण्याचा सारीपाटाचा खेळ डिसेंबरपासून सुरू आहे. मागील तीन महिन्यांपासून शासनाच्या नियमानुसार मापन पुस्तिका, अंदाजपत्रका नुसार कांदा चाळचे प्रस्ताव तयार करून पात्र लाभार्थ्यांना जवळपास १ लाख ७५ हजार रुपये खर्च करून प्रस्ताव उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयांना पाठवून देण्यात आले आहे. त्या वेळची तांत्रिक कारणे आणि आता आर्थिक तरतुदीचे कारण पुढे करण्यात येत आहे.