३०० हेक्टरवर कांद्याचे बिजोत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:32 AM2021-01-25T04:32:05+5:302021-01-25T04:32:05+5:30
विष्णू वाकडे लोकमत न्यूज नेटवर्क जालना : गतवर्षी कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम रब्बीतील कांदा बिजोत्पादनावर ...
विष्णू वाकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गतवर्षी कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम रब्बीतील कांदा बिजोत्पादनावर झाला आहे. सध्या जालना तालुक्यात जवळपास ३०० हेक्टरहून अधिक क्षेत्रावर कांदा बिजोत्पादन घेतले जात आहे.
गतवर्षी खरीप हंगामातील कांदा काढणीला येताच अधिकचा पाऊस झाला. त्यामुळे हाती आलेले कांद्याचे पीक वाया गेले होते. याचा परिणाम कांदा उत्पादनावर झाला. त्यामुळे यंदा रब्बी हंगामात कांदा बियाण्यांची उत्पादनासाठी मागणी वाढली. कांदा बियाण्याचे दर मध्यंतरी तब्बल प्रतिकिलो चार ते ४ हजार ५०० रूपये झाले होते.
हातवण येथील प्रगतशील शेतकरी संकेत बोरले म्हणाले, मागील चार ते पाच वर्षांमध्ये कांदा बियाण्याला प्रतिकिलो अवघे एक हजार ते बाराशे रूपयांचा दर होता. परंतु, मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा बियाण्याच्या दरात वाढ झाली. शिवाय पाऊसही समाधानकारक असल्यामुळे कांदा लागवड केली. एकरी खर्च वजा जाता १ लाख रूपयांपर्यंतचे उत्पन्न कांदा बिजोत्पादनातून मिळेल, असेही ते म्हणाले. मंडल कृषी अधिकारी अजय सुखदेवे म्हणाले, गोलापांगरी मंडलातील कांदा बिजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून कांद्याच्या बिजोत्पादनाविषयी मार्गदर्शन घेतले आहे.
यंदा कांदा बिजोत्पादनासाठी वातावरणही पोषक आहे. मात्र, असे असले तरी बियाण्याचे योग्य परागिकरण होण्यासाठी मधमाशांचीही गरज तेवढीच आहे. सध्या तालुक्यात लागवड झालेल्यांपैकी अनेक बिजोत्पादनाचे प्लॉट बहरात आले आहेत. भाटेपुरी परिसरातील वडिवाडी, हातवण, कारला, खणेपुरी, पाचनवडगाव, वानडगाव आदी गावांमधील शेतकऱ्यांनी कमी-अधिक प्रमाणात कांदा बिजोत्पादन घेतले आहे.
वडिवाडी येथील प्रगतशील शेतकरी गजानन सोनवणे म्हणाले, मागील सात-आठ वर्षांपासून मी कांदा बिजोत्पादन घेत आहे. बिजोत्पादनामध्ये सातत्य ठेवल्याने फायदा होता. यंदा ४० क्विंटल कांदा लावला असून, सध्या तो चांगल्या स्थितीत आहे.
चौकट
तालुका कृषी अधिकारी संतोष गाडे म्हणाले, जालना तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा यंदा कांदा बिजोत्पादन घेण्याकडे कल आहे. तालुक्यात जवळपास ३०० हेक्टरवर कांदा बिजोत्पादनाची शेती केली जात आहे. उत्पादकांनी कांद्याला पाणी देताना नियोजन करणे गरजेचे आहे. पाणी देताना सूक्ष्म सिंचनाचा उपयोग करावा. अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा, असेही गाडे यांनी सांगितले.