ऑनलाइन चॅटिंग; ती बाई नव्हे बाबा, ११ हजारांना लावला चुना
By विजय मुंडे | Published: August 10, 2023 12:40 PM2023-08-10T12:40:50+5:302023-08-10T12:42:27+5:30
बनावट खाते, सायबर पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात
जालना : फेसबूकवर अनोळखी महिलेशी ऑनलाइन चॅटिंग करणे एकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. ११ हजार रूपयांची फसवणूक झाल्यानंतर त्या व्यक्तीने सायबर पोलिसांत धाव घेतली. सायबर पोलिसांच्या तपासात ती बाई नव्हे तर बाबा असल्याचे समोर आले असून, महिलांच्या नावे बनावट खाते उघडणाऱ्या दोघांना पोलिसांनी मंगळवारी जेरबंद केले.
सोपान बाजीराव पांचाळ (३२ रा. लोणी खुर्द ता.पूर्णा. जि.परभणी) व ज्ञानेश्वर प्रल्हाद पांचाळ (२३ रा. सालेगाव ता. नायगाव जि.नांदेड) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. जालन्यातील एका व्यक्तीला फेसबूकवर सुनीता देशमुख (बनावट खात्यावर टाकलेले नाव) नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर त्या महिलेने संबंधित व्यक्तीशी ऑनलाइन चॅटिंग सुरू केली. वेगवेगळ्या कारणांनी पैशांची मागणीही केली. संबंधित व्यक्तीने फोन पेवर काही पैसेही टाकले. परंतु, नंतरही ती महिला विविध कारणे देत पैसे मागू लागली. फोन केल्यानंतर ती महिला फोनवर न बोलता चॅटिंगवर बोलण्याचा आग्रह धरू लागली.
या कालावधीत संबंधित व्यक्तीने जवळपास ११ हजार रूपये त्या महिलेला दिले होते. केवळ ऑनलाइन चॅटिंग होत असल्याने आपली फसवणूक होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्या व्यक्तीने सायबर पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी विविध मार्गांनी तपास केल्यानंतर ते फेसबूक अकाऊंट बनावट असल्याचे समोर आले. पोलिसांनी कारवाई करीत सोपान बाजीराव पांचाळ व ज्ञानेश्वर प्रल्हाद पांचाळ या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन मोबाईल, तीन सीमकार्ड, रोख रक्कम असा एकूण २६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. शालीनी नाईक, सपोनि. सुरेश काळे, सपोनि. संभाजी वडते, पाेउपनि. देशमुख, सफौ. पाटोळे, पोहेकॉ. राठोड, पोना. मांटे, मुरकुटे, पालवे, नागरे, भवर, गुसिंगे, दुनगहू यांच्या पथकाने केली.