पोलीस अधीक्षक कार्यालयात आॅनलाईन तक्रार केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:13 AM2017-12-27T00:13:09+5:302017-12-27T00:13:12+5:30
आॅनलाईन तक्रार नोंदविण्यासाठी येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सुविधा केंद्र सुरू करण्यात आले असून, कुठल्याही पोलीस ठाण्यात आता तक्रार नोंदविणे सोपे झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आॅनलाईन तक्रार नोंदविण्यासाठी येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सुविधा केंद्र सुरू करण्यात आले असून, कुठल्याही पोलीस ठाण्यात आता तक्रार नोंदविणे सोपे झाले आहे.
महापोलीस डॉट महाराष्टÑ डॉट गर्व्ह डॉट इन या संकेतस्थळावर सर्वसामान्य नागरिकांना आॅनलाईन तक्रार नोंदविता यावी, यासाठी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर ई-तक्रार, ई-तक्रारीची सद्य:स्थिती, भाडेकरु, पेर्इंग गेस्टची माहिती भरणे, कर्मचारी तपासणी, घरगुती नोकर तपासणी, चारित्र्य प्रमाणपत्र विनंती, मिरवणूक विनंती, सी-फॉर्म, वाहन चौकशीचे अर्ज करता येणार आहेत.
तसेच एफआयआर, अटक, आरोपांची माहिती, हरविलेल्या व्यक्तीची माहिती, अनोळखी मृतदेहाची माहिती, फरारी व्यक्तीची माहिती, हरवलेल्या मोबाईलच्या सूचना सुध्दा पाहता येणार आहेत. तक्रारीची तात्काळ दखल घेतली जाणार असून तक्रार अर्जाच्या चौकशीबाबत अर्जदारास त्याच्या मोबाईलवर तात्काळ एसएमएसद्वारे कळविले जाणार आहे. तक्रारदारास त्याचे संकेतस्थळावर खाते उघडल्याशिवाय तक्रार नोंदविता येणार नाही.
नागरिकांना अडचणी येत असल्याने पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अपर पोलीस अधीक्षक लता फड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आॅनलाईन तक्रार नोंदवण्यासाठी सुविधा केंद्रही उपलब्ध करुन दिले आहे.