ऑनलाइन शिक्षण अन् मोबाइलने लावला मुलांना चष्मा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:20 AM2021-07-19T04:20:11+5:302021-07-19T04:20:11+5:30
जालना : कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आणि मुलांचा दिवस मोबाइलमध्येच जात लागला आहे. परंतु, मोबाइलच्या अतिवापरामुळे अनेक मुलांच्या ...
जालना : कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आणि मुलांचा दिवस मोबाइलमध्येच जात लागला आहे. परंतु, मोबाइलच्या अतिवापरामुळे अनेक मुलांच्या डोळ्यांवर आणि मानसिकतेवरही परिणाम होत आहेत.
नवीन शैक्षणिक वर्षात ऑनलाइन पद्धतीने दिवसाकाठी पाच ते सहा तास घेतले जातात. सकाळी साडेसात ते दुपारी साडेबारा आणि नंतरच्या वेळेतही ऑनलाइन शिक्षण दिले जाते. त्यानंतर मोबाइलवर येणारा गृहपाठ पाहणे, मोबाइलवरूनच शिक्षणांना पाठविणे, अभ्यासानंतर कार्टून पाहणे अशाप्रकारे मुलांचा संपूर्ण दिवस मोबाइलमध्ये जात आहे. त्यामुळे अनेकांच्या डोळ्यावर परिणाम होत असून, मुलांना आता चष्म्यांचा आधार घ्यावा लागत आहे.
लहान मुलांमध्येही डोकेदुखी वाढली
मोबाइलमध्ये सतत गुंग राहणाऱ्या मुलांच्या डोळ्यात जळजळ करून नंतर डोकेदुखी होण्याचा त्रास वाढला आहे.
डोळे कोरडे पडण्याचा त्रासही अनेकांना होऊ लागला आहे. शिवाय अनेकांना चष्मे लागू लागले आहेत.
मोबाइल, संगणक विश्वामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यासह शरीरावरही विपरित परिणाम होत आहेत.
पालकही चिंतित
कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे मुलं शिक्षणाच्या प्रवाहात राहत आहेत. परंतु, मुलांचा दिवस मोबाइलमध्ये जात आहे. मोबाइलच्या अति वापरामुळे डोळे जळजळ करणे, डोके दुखणे आदी त्रास होत असल्याच्या तक्रारी मुलं करीत आहेत. ही बाब पाहता मुलांच्या शाळा सुरू होणे गरजेचे आहे.
- ज्ञानेश्वर छल्लारे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांना ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. यात अनेक मुलं मोबाइल, टॅबसह संगणकावर अभ्यास करतात. परंतु, त्याच्या अति वापरामुळे मुलांना त्रास होत आहे. अनेक लहान मुलांना चष्मे लागले आहेत. मुलांचा हा त्रास पाहता इतर वर्गाप्रमाणे प्राथमिक शाळा सुरू करणे गरजेचे आहे.
- कृष्णा फुटाणे
डोळ्यांची काळजी घेणे अधिक गरजेचे
ऑनलाइन शिक्षण असो किंवा अधिक काळ टीव्ही पाहणे असो, त्यामुळे मुलांच्या डोळ्यावर परिणाम होतो. त्यामुळे मोबाइलचा प्रमाणात वापर करणे गरजेचे आहे. शिवाय मुलांच्या डोळ्यांबाबत काही तक्रारी असतील तर त्यांनी तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
-डॉ. यू. एल. परीटकर, नेत्रविभागप्रमुख