केवळ २० टक्के शेतकऱ्यांनी केली ऑनलाईन नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:31 AM2021-09-25T04:31:57+5:302021-09-25T04:31:57+5:30
टेंभुर्णी : यावर्षीपासून शासनाने शेतकऱ्यांचा पीक पेरा स्वतःच ऑनलाईन नोंदविण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, हा ऑनलाईन पीक ...
टेंभुर्णी : यावर्षीपासून शासनाने शेतकऱ्यांचा पीक पेरा स्वतःच ऑनलाईन नोंदविण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, हा ऑनलाईन पीक पेरा नोंदविताना शेतकऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या ऑनलाईन नोंदणीबाबत सध्या तरी टेंभुर्णी परिसरातील शेतकरी फारसा उत्सुक दिसत नाही.
टेंभुर्णी तलाठी सजाअंतर्गत येणाऱ्या टेंभुर्णी, आंबेगाव व गणेशपूर या तीन गावांतील मिळून आतापर्यंत केवळ २० ते २५ टक्के शेतकऱ्यांनीच या पद्धतीने आपला पीक पेरा नोंदविल्याची माहिती मिळाली आहे.
पीक पेरा नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलमध्ये ई-पीक ॲप डाऊनलोड करून त्याद्वारे शेतातील खरीप पिकांची छायाचित्रासह नोंद करायची आहे. मात्र, अँड्राॅईड मोबाईल नसणे, रेंजची समस्या, याबाबतचे तांत्रिक ज्ञान नसणे, नोंदणीबाबत भीती आदी अडचणी नोंद घेताना शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या पद्धतीने पीक पेरा नोंदणीकडे पाठ फिरविल्याचे चित्र परिसरात दिसत आहे.
टेंभुर्णी तलाठी कार्यालयामार्फत सध्या शेता-शेतात जाऊन याबाबतचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखविले जात आहे. गुरुवारी तलाठी कार्यालयाच्या पथकाने टेंभुर्णी व गणेशपूर शिवारात ठिकठिकाणी हे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखविले. यावेळी तलाठी राम धनेश, तंत्रस्नेही कर्मचारी राजू खांडेभराड, कैलास देशमुख, शेतकरी रावसाहेब अंभोरे, विष्णू डव्हळे, वैभव डव्हळे, अभिषेक अंभोरे, दिनकर देशमुख आदींची उपस्थिती होती.
कोट
पीक पेरा ऑनलाईन नोंदणीचे काम अतिशय सोपे असून, यामुळे शेतकऱ्यांच्या तलाठी कार्यालयावरील चकरा वाचणार आहेत. ॲप डाऊनलोड केल्यानंतर केवळ ५ ते १० मिनिटांत सर्व पिकांची नोंद घेतली जाते. एकाच मोबाईलमधून अनेक शेतकऱ्यांची नोंदणी होऊ शकते. युवा पिढीतील शेतकऱ्यांच्या मुला, नातवांनी याकामी पुढाकार घेतला तर हे काम पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. यासाठी आम्ही ठिकठिकाणी प्रात्यक्षिक दाखवीत आहोत. शेतकऱ्यांनी वेळेत नोंद करून घ्यावी.
राम धनेश, तलाठी, टेंभुर्णी.
फोटो- टेंभुर्णी येथील शेतकरी रावसाहेब अंभोरे यांच्या शेतात पीक पेरा नोंदणी प्रात्यक्षिक करून दाखविताना तलाठी राम धनेश, राजू खांडेभराड, कैलास देशमुख आदी.