१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 07:31 PM2024-10-17T19:31:43+5:302024-10-17T19:34:16+5:30
चर्चेत काही इच्छुकांनी निवडणूक लढविण्याचा तर काहींनी सत्ताधाऱ्यांना पाडण्याचा आग्रह धरला. : मनोज जरांगे
वडीगोद्री (जि.जालना) : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरूवारी दिवसभरात समाजाकडून उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज केलेल्या १८०० वर इच्छुकांशी चर्चा केली. या चर्चेत काही इच्छुकांनी निवडणूक लढविण्याचा तर काहींनी सत्ताधाऱ्यांना पाडण्याचा आग्रह धरला. आज केवळ चर्चा झाली असून, अंतिम निर्णय हा २० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बैठकीत समाज घेणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली.
मराठा आरक्षण आंदोलन, निवडणुकांबाबत आज इच्छुकांशी चर्चा केली आहे. पुढे कसे जायचे, निवडणुकीचे चांगले-वाईट परिणाम यासह इतर बाबींवर चर्चा झाली. आम्हाला ९५ टक्के समाजकारण आणि ५ टक्के राजकारण करायचे आहे. त्यामुळे राज्यातील सर्व समाज महत्त्वाचा आहे. आज मराठा समाजासह मुस्लिम, मागासवर्गीय, १८ पगड जातीतील समाजाचे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे आज केवळ चर्चा झाली आहे. १८०० वर इच्छुकांचे अर्ज आले आहेत. याला गर्दी न म्हणता समाजाच्या आक्रोशाची लाट म्हणता येईल. ही लाट शंभर टक्के विजयाकडे जाणार असल्याचा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. शेवटी लढायचे की पाडायचे याचा अंतिम निर्णय हा समाज घेणार असल्याचेही जरांगे पाटील यांनी सांगितले.
बैठकीला मोठी गर्दी
आगामी विधानसभेत लढायचे की पाडायचे यावर जरांगे पाटील यांनी इच्छुकांना अंतरवाली सराटी येथे बैठकीसाठी बोलाविले होते. अंतरवाली सराटी हजारोच्या संख्येने इच्छुक उपस्थित होते. यादरम्यान लढायचे की पाडायचे याबाबत सर्वांनी आपले मते मांडली. ही बैठक सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत चालू होती. यावेळी रामगव्हाण रोडला मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.