लोकहिताची कामे करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:30 AM2021-09-19T04:30:51+5:302021-09-19T04:30:51+5:30
जालना : लोकहिताची कामे करणाऱ्या आणि पक्षसंघटन वाढविणाऱ्या कार्यकर्त्यासच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी दिली जाईल, अशी माहिती ...
जालना : लोकहिताची कामे करणाऱ्या आणि पक्षसंघटन वाढविणाऱ्या कार्यकर्त्यासच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी दिली जाईल, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली.
बदनापूर येथे शुक्रवारी काँग्रेस पक्षाच्या बुथ कमिटी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, कार्याध्यक्ष राजेंद्र राख, जालना शहराध्यक्ष शेख महेमूद, सरचिटणीस राम सावंत, सुधाकर निकाळजे, जय भवानी महासंघाचे अध्यक्ष व ओबीसी - व्हीजेएनटी मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल देशमुख, काँग्रेस पक्ष सफाई सेलच्या जिल्हाध्यक्षा नंदा पवार, माजी नगरसेवक राजेंद्र जैस्वाल, भोकरदन नगर पालिकेचे काँग्रेस गटनेते संतोष अन्नदाते, काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष बदर चाऊस, काँग्रेस सेवा दलाचे प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा पडुळ, काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विजय जऱ्हाड, रऊफ परसुवाले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
बदनापूर तालुका एकेकाळचा काँग्रेसचा बालकिल्ला होता. राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस आघाडी झाल्यानंतर बदनापूर विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादीकडे गेला. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार सतत पराभूत होत असल्याने पुढे हा मतदार संघ पक्षीय तडजोड झाल्यास काँग्रेसच्या ताब्यात घेणार असल्याचा दावा आमदार गोरंट्याल यांनी केला. काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी तसेच पक्षीय संघटन वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी राजेंद्र राख, बाळासाहेब सानप, राजाभाऊ देशमुख व इतरांनी मार्गदर्शन केले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो